मुंबई : ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच हिमाचल प्रदेश आणि देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या काही भागांमध्ये वातावरणात सुखकारक बदल पाहायला मिळाले. या महिन्याचा पंधरवडा उलटत असतानाच हिमाचल प्रदेशच्या काही भागांत बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी म्हणून पर्यटकांची पावलं थेट देवभूमी हिमाचलकडे वळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचलमधील रोहतांग पाससह विविध पर्यटन स्थळांवर असणाऱ्या आणि पर्यटनाच्या सुविधा पुरवणाऱ्या व्यावसायिकांमध्ये वातावरणात आलेल्या या बदलामुळे उत्साह पाहाचयला मिळत आहे. 


हिमाचल प्रदेशात कांगडा जिल्ह्याच्या बैजनाथ, पालमपूरमध्ये मंगळवारी पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. ज्यामुळे शेतात ठेवलेल्या पिकांचं नुकसान झालं. उत्तराखंडच्या चमोलीतील काही भागांमध्येही बर्फवृष्टी सुरू आहे. फक्त हिमाचलच नव्हे, तर उत्तराखंडमध्येही तापमानाचा पारा खाली आल्यामुळे येथेही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या सर्व वातावरणात थंडीपासून बचावासाठी स्थानिक नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. 


हिमाचलमधील पर्वतीय भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे पर्वतीय भागांच्या तळाशी असणाऱ्या गावांमध्येही याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत. वातावरणातील बदल, बर्फवृष्टी अशी एकंदर परिस्थिती पाहता सध्याच्या घडीला येथील प्रशासनाकडून स्थानिकांसोबतच पर्यटकांनाही सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. बद्रीनाथ धाम येथील पर्वतरांगांवरही बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. तर, सतोपंथ ट्रेकच्या वाटेवरही बर्फवृष्टी झाल्यामुळे ट्रेक करण्यासाठी आलेल्य़ांच्या प्रवासात चार चाँद लागले आहेत.