नवी दिल्ली : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयाला व्यापार संघटनांनी विरोध केला आहे. हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर शिवसेना खासदार संजय राऊत (SANJAY RAUT ) यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे.  


राज्य मंत्रिमंडळाने काल दुकानावर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयातून दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना वगळण्यात आले होते. मात्र, काल घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आता दहापेक्षा कमी किंवा अधिक कामगार संख्या असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी हा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे.


या निर्णयाला व्यापारी वर्गाने विरोध दर्शविला आहे. यावर संजय राऊत यांनी कुणी विरोध केला तर त्यांना सरळ करु असं म्हटलं आहे.


हि बातमीही वाचा :  मराठी पाट्यांवरुन श्रेयवादाची लढाई, राज ठाकरे यांनी केलं मनसैनिकांचं अभिनंदन


महाराष्ट्रात राहायचं आहे हे विसरु नका


“विरोध करतो म्हणजे काय… तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र किंवा मग कर्नाटक प्रत्येक राज्याला अधिकार आहे, त्या भाषेचा अधिकार आहे. विरोध कसला करत आहात… तुम्हाला मुंबईत राहायचं आहे, महाराष्ट्रात राहायचं आहे हे विसरु नका. तुम्हाला येथे राहायचं आहे, व्यापार करायचा आहे. हे काही व्यक्तिगत किंवा राजकीय भांडण नाही कोणाचं. करणार नाही म्हणजे काय?”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनावलं.


काय आहे निर्णय?


आस्थापनेचा नामफलक हा मराठीबरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा दुकानास, बार, रेस्टॉरंटला महापुरुष किंवा आदरणीय महिलांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असाही निर्णय घेण्यात आला आहे.