जळगाव: हमीभावानुसार धान्य खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात दंड व शिक्षा असा कायदा करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. याविरोधात राज्यभरातील व्यापाऱ्यांनी विरोध करत बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. जागतिक बाजारात भुसार मालाची मंदी पाहता हमी भावात माल घेणे शक्य नाही, असे जळगाव येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जवळपास २ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.


या निर्णयाविरोधात अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद सुरु केला आहे. विदर्भातील दुसरी मोठी बाजारपेठ असणाऱ्या अकोला बाजार समितीसह वाशिम बाजार समितीही अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांचा माल हमीभाव पेक्षा कमी दराने खरेदी केल्यास व्यापाऱ्याला एका वर्षाची सक्त मजुरी आणि ५० हजार रुपयाचा दंड अशी तरतूद करण्यात आली होती. निर्णयाचा संमिश्र प्रतिसाद राज्यातील बाजार समित्यांमधून दिसून येत आहे. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करुन तो मागे घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.