Kanpur Railway Accident: उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एका महिन्याच्या आत दुसऱ्यांदा ट्रेन अपघात घडवून आणण्याचा कट उधळून लावण्यात यंत्रणांना यश आलं आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास प्रयागराजवरुन भिवानीला जाणारी कालिंदी एक्सप्रेसच्या मार्गावरील एलपीजी गॅस सिलेंडरला धडकली. 17 ऑगस्ट रोजी रात्री अडीचच्या सुमारास सुद्धा साबरमती एक्सप्रेसचे 22 डबे मार्गावरुन उतरले होते. रेल्वेने या अपघातांमध्ये घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 सप्टेंबरच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अनवरगंज ते कासगंज रेल्वे मार्गावर बर्राजपूर आणि बिल्हौरदरम्यान कालिंदी एक्सप्रेसच्या मार्गावर गॅस भरलेले एलपीजी सिलेंडर ठेवण्यात आले होते. या सिलेंडरला धडकली. लोको पायलेटने ट्रॅकवर संक्षयास्पद वस्तू दिल्याने ब्रेम मारल्याचं सांगितलं. मात्र ट्रेन वेगात असल्याने या सिलेंडरला धडकली. त्यामुळे मोठा आवाज आला. ड्रायवरने ट्रेन थांबवून गार्ड आणि इतरांना याची माहिती दिली. 


तपास यंत्रणांच्या तुकड्या घटनास्थळी दाखल


या घटनेची माहिती मिळताना दहशतवादी विरोधी पथक आणि इतर तपास यंत्रणांच्या टीम घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी तपास सुरु केला. दहशतवादीविरोधी पथकाच्या कानपूर आणि लखनऊमधील तुकड्या घटनास्थळी पोहचल्या असून पुरावे गोळा करत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनवरगंज पोलीस स्टेशनचे रेल्वे अधीक्षक, आरपीएफ आणि अन्य रेल्वे अधिकारी घटनास्थली पोहोचले.


झुडपांमधून सापडल्या धक्कादायक गोष्टी


घटनास्थळी तपासणी केल्यानंतर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये पोलिसांना एक सिलेंडर, पेट्रोलची बाटली, माचिस, दारुगोळा, पेट्रोल बॉम्ब यासारखे घातक पदार्थ आढळून आले. एक संशयास्पद पिशवीही पोलिसांना सापडली आहे. सदर घटनेनंतर ही ट्रेन अर्धा तास रोखून धरण्यात आल्यानंतर पुन्हा मार्गस्थ झाली. पोलिसांनी या ठिकाणी फॉरेन्सिक तपास सुरु केला आहे. सर्व संक्षयास्पद वस्तू ताब्यात घेऊन चाचणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.


जो कोणी असेल त्याला अटक करणारच


हे सारं घडवण्याचा ज्याचा कोणाचा प्रयत्न असेल त्याला आम्ही नक्कीच अटक करु असं अतिरिक्त पोलीस आयुक्त हरीश चंद्र यांनी सांगितलं आहे. सध्या फॉरेन्सिक तपासणीमधून काय महिती समोर येत याकडे पोलिसांबरोबरच तपास यंत्रणांचं लक्ष लागून राहिलं आहे. या घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. सध्या या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वेने एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.


काही दिवसांपूर्वीच झालेला अपघात


17 ऑगस्ट रोजी कानपूर-झांशी मार्गावरील साबरमती एक्सप्रेसचे 22 डब्बे मार्गावरुन घसरले होते. बोल्डर इंजिनला धडकल्याने अपघात झाल्याचं या गाडीच्या ड्रायव्हरने सांगितलं होतं. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नव्हती. आता असाच प्रकार पुन्हा घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.