आईच्या हातातून तान्हुली सटकली आणि रेल्वे ट्रॅकवर पडली...
रेल्वे स्थानकात एक तान्हुली मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली. नेमकी त्याचवेळी धडधडत ट्रेन आली. मथुरा रेल्वे स्थानकात मंगळवारी दुपारी चमत्कार घडला.
मथुरा : रेल्वे स्थानकात एक तान्हुली मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली. नेमकी त्याचवेळी धडधडत ट्रेन आली. मथुरा रेल्वे स्थानकात मंगळवारी दुपारी चमत्कार घडला. जेमतेम एका वर्षाची तान्हुली मुलगी आईच्या हातात खेळत होती. फलाटावर ट्रेनची वाट पाहत असलेल्या आईच्या हातातून ती सटकली आणि रेल्वे ट्रॅकवर पडली. नेमकी त्याचवेळी समोरून रेल्वे गाडी धडधडत आली. सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. आता काय होणार?
फलाटावर उभा असलेला प्रत्येकजण जागच्या जागी खिळला होता. ट्रेन आली आणि धडधडत निघून गेली. पण म्हणतात ना, जा को राखे साईयाँ मार सके ना कोय. अख्खी ट्रेन अंगावरून गेली तरी या तान्हुल्या मुलीला साधं खरचटलं देखील नाही... एकानं रेल्वे ट्रॅकवर उडी मारली आणि त्या मुलीला आईच्या स्वाधीन केलं. आपल्या मुलीला पाहून त्या माऊलीचा आनंद गगनात मावेनासा झाला. देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.