पोलीस अधिकाऱ्याला सहलीवर पिस्तुलसोबत फोटो काढणं महागात, अचानक फायरिंग झाली आणि....
पोलिसांनी प्रशिक्षणार्थी डेप्युटी एसपी आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आहे.
(झारखंड) कोडरमा : तरुण मंडळी जेव्हा सहलीला जातात तेव्हा ते मस्करी मस्करीत असे काही करतात की, नंतर त्यांना खूपच महागात पडते आणि त्यांच्यावर आयुष्यभर त्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. अशीच एक घटना झारखंड येथील कोडरमा भागातील आहे. मित्रांसोबत सहलीला जाणे आणि फोटो काढणे झारखंड पोलिसातील एका तरुण ट्रेनी डेप्युटी एसपीला खूप महागात पडले. त्याच्या सर्व्हिस पिस्तूलसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यातून चुकून गोळी सुटल्याने डेप्युटी एसपीच्या मित्राचा जीव गेला आहे.
पोलिसांनी प्रशिक्षणार्थी डेप्युटी एसपी आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आहे. कोडरमा (झारखंड) पोलिसांच्या पथकानेही अपघात घडवून आणलेल्या शस्त्राला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या या मस्करीने आणि फोटो काढण्याच्या मोहाने एका निष्पाप तरूणाचा जीव घेतला आहे.
पोलिसांनी ट्रेनी डेप्युटी एसपीच्या बोटाचा छापा घेतला आहे, परंतु अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या दुसर्या मित्रांना ताब्यात घेऊन या घटनेचा उच्चस्तरीय तपास सुरू केला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
कोडरमा जिल्हा पोलीस मुख्यालयाचे डीएसपी संजीव कुमार सिंह यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांच्या मते, हा अपघाती मृत्यू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फोटो काढताना अपघात झाला
कोडरमा जिल्ह्यातील ही घटना घडली जेव्हा आशुतोष कुमार आपल्याच वयाच्या काही मित्रांसह तिलैया धरणावर सहलीला गेले होते. ते धरणावर फोटो काढत असताना. आशुतोष कुमारला यांना त्यांच्या सर्व्हिस पिस्तूलसोबत फोटो काढण्याची कल्पना मनात आली.
सर्व्हिस पिस्तूलसोबत ते फोटो काढत असताना, अचानक पिस्तुलातून गोळी निघाली. ही गोळी जवळच असलेल्या त्यांच्या मित्राला म्हणजे निखिल रंजन यांना लागली आणि त्यानंतर निखिलचा जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी निखिल रंजन याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्रशिक्षणार्थी डेप्युटी एसपी आशुतोष कुमार आणि त्यांच्या सोबत उपस्थित आणखी मित्रांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उर्वरित काडतुसा समवेत ती पिस्तूलही पोलिसांनी जप्त केली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या निखिल रंजन यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहेत.