मुंबई : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. पण देशभरातल्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या १२ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहेत. मालवाहतुकीच्या गाड्या मात्र सुरू राहतील. मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सध्या सुरू आहे, तशीच लोकल सेवा सुरू राहणार आहे.




दरम्यानच्या काळात ज्यांनी बुकिंग केलं आहे, त्यांना पैसे रिफंड मिळणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. देशभरामध्ये २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलं. यानंतर रेल्वे सेवा बंद करण्यात आली. परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरू करण्यात आली होती. तसंच मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीही ट्रेनसेवा सुरू करण्यात आली, पण अजूनही सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली नाही.