नवी दिल्ली: सांस्कृतिकदृष्ट्या विचार करायचा झाल्यास मला दक्षिण भारतापेक्षा पाकिस्तान अधिक जवळचा वाटतो, असे वादग्रस्त विधान काँग्रेस खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांनी केले. ते शुक्रवारी कसौली येथील साहित्य संमेलनात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सिद्धू यांना भारत आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामध्ये काय फरक वाटतो, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सिद्धू यांनी म्हटले की, मी जेव्हा दक्षिण भारतात प्रवास करतो, तेव्हा मला भाषेची अडचण जाणवते. मला तेथील खाणं आवडत नाही, असे नव्हे. मात्र, मी जास्त दिवस ते खाऊ शकत नाही. कारण, तेथील संस्कृती पूर्णपणे भिन्न आहे. 


मात्र, मी जेव्हा पाकिस्तानात जातो तेव्हा तेथे भाषेची अडचण जाणवत नाही. तुम्हाला इंग्रजीत दहा शिव्या द्यायला लागतात. पण पंजाबी भाषेतील एकच शिवी पुरेशी ठरते, असे सांगत सिद्धू यांनी पाकिस्तानमधील पंजाब प्रांत आपल्याला अधिक जवळचा असल्याचे सांगितले. 


सिद्धू यांच्या या विधानावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीवेळी सिद्धू पाकिस्तानात गेले होते. त्यावेळीही अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती.