नवी दिल्ली : सलग सुट्टी आली की अनेकदा मित्रमंडळीसोबत बाहेर जाण्याचा बेत ऐनवेळी ठरतो. अशा वेळी किफायतशीर दर असल्याने रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. पण आयत्यावेळी तिकिटांची पंचाईत होते. ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुक करण्याची सोय असल्याने तिकीटे आरक्षित केली जातात. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना तात्काळ तिकीटाच्या भरवशावर राहावे लागते. अशावेळी आपल्याला तात्काळ तिकीटाबाबत असलेल्या नियमांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. 


असे मिळवा तात्काळ तिकीट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तात्काळ स्वरुपातील एसी कोचच्या तिकीटविक्रीला सकाळी १० वाजेपासून सुरुवात होते. तर नॉन एसीच्या तिकीटविक्रीला सकाळी ११ पासून सुरुवात होते. तात्काळ तिकीट प्रवास करण्याच्या एका दिवसआधी काढता येते. तात्काळ तिकीट (ऑनलाईन) आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन देखील काढण्याची सोय आहे. तसेच रेल्वे स्थानकांवरील आरक्षण केंद्रावरुन देखील तिकीट घेऊ शकता. ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढण्याची सोय झाल्यापासून बऱ्याच वेळेस जास्त तिकीट काढली जातात. त्यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी एका खात्यावरुन (रेल्वेचे खाते) कमाल २ तिकीट काढण्याची मर्यादा घातली आहे. 


सर्वसामान्यांना तात्काळ तिकीट मिळावे यासाठी अधिकृत एंजटांना तिकीट आरक्षण सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या अर्ध्या तासात तिकीट आरक्षित करता येणार नाही. तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी तुम्हाला तिकीटाच्या मुळ किंमतीपेक्षा अधिकचे पैसे मोजावे लागतात. द्वितीय श्रेणीतील तात्काळ तिकीटावर प्रवाशांना १० टक्के तर इतर श्रेणीतील तिकीटांसाठी, तिकीटाच्या ३० टक्केपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागेल. 


तिकीट रद्द करण्याचे नियम


तुम्ही घेतलेले तात्काळ तिकीट रद्द केल्यास तुम्हाला रकमेचा परतावा मिळणार नाही. तुम्ही काढलेले तिकीट कन्फर्म नसल्यास तसेच ते रद्द केल्यावर तुम्हाला संपूर्ण रक्कम परत दिली जाणार. तुम्ही ऑनलाईन तिकीट काढले असेल तर तिकीट रद्द करण्याचे शुल्क कापून उर्वरित रकम ही तुमच्या खात्यात जमा केली जाते. जर तुम्ही तात्काळ तिकीट खिडकीवरुन काढले असेल (ऑफलाईन) आणि रद्द करायचे असेल तर, तुम्हाला तिकीट खिडकीवर जाऊनच रद्द करता येईल.