`माझं निधन झालं आहे, अर्ध्या दिवसाची सुट्टी द्या...` विद्यार्थ्याचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल
सुट्टीसाठी स्वत:च्याच निधनाच्या विद्यार्थ्याच्या अर्जावर मुख्याध्यापकांचा शेरा पाहून व्हाल हैराण
Trending News : शाळेला दांडी मारण्यासाठी विद्यार्थी अनेक कारणं देतात. कधी आजारी असल्याचं तर कधी नातेवाईंकच्या निधनाचं. पण एका विद्यार्थ्याने दिलेलं कारण तुम्ही कधीही ऐकलं नसेल. अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळावी यासाठी एका विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांना अर्ज केला. हा अर्ज वाचून मुख्याध्यापकही हैराण झाले. सुट्टीसाठी विद्यार्थ्याने केलेला अर्ज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.
सुट्टीसाठी मुख्याध्यापकांना अर्ज
आठवीतल्या एका विद्यार्थ्याने सुट्टीसाठी दिलेला हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विद्यार्थ्याने आपल्याला शाळेतून अर्ध्या दिवसाची सुट्टी हवी असल्याचं अर्जात म्हटलं आहे. यासाठी त्याने दिलेलं कारण मात्र फारच विचित्र आहे. या अर्जात त्यानं स्वत:चंच निधन झाल्याचं लिहिलं असून अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याची विनंती केली. विशेष म्हणजे मुख्याध्यापकांनीही विद्यार्थ्याची विनंती मान्य करत सुट्टी मंजूर करत असल्याचा शेरा त्या अर्जावर लिहिला.
काय लिहिलंय पत्रात
या विद्यार्थ्याने आपल्या लिहिलंय, सविनय निवेदन, सकाळी 10 वाजता माझं निधन झालं. महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याची कृपा करावी, मोठी दया होईल... यावर मुख्याध्यापकांनी लाल पेनाने सुट्टी मंजूर झाल्याचा शेरा दिला आणि स्वाक्षरीही केली. सुट्टी मंजूर झाल्याने विद्यार्थी अर्ध्या दिवसाने शाळेतून निघून गेला. अर्ज निट न वाचताच मुख्याध्यापकांनी सुट्टी मंजूर केली.
या प्रकारची शाळेत चांगलीच चर्चा रंगली. विद्यार्थ्याने हा अर्ज लपवून ठेवला होता. पण ज्यावेळी तो अर्ज त्याच्या शाळेतल्या मित्रांच्या हाती लागला, तेव्हा त्यांनी त्या अर्जाचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर हा अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा प्रकार शाळेतील शिक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली.