बे-एके-बे, बे-दुने...नवरदेवाला दोनचा पाढाही येईना, होणाऱ्या नवरीने भर मंडपात उचललं असं पाऊल
Trending News: प्रत्येक मुलीला किंवा मुलाला आपला जोडीदार हा चांगला शिकलेला आणि चांगली कमाई करणारा हवा अशी अपेक्षा असते. अनेकवेळा लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराच्या उणिवा समोर येतात आणि मग आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते.
Weird Wedding : लग्न हा प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. आपल्या जोडीदाराबद्दल प्रत्येक मुला-मुलीची खास स्वप्न असतात. आपला जोडीदार हा चांगला शिकलेला आणि चांगली कमाई करणारा हवा अशी अपेक्षा असते. पण अनेकवेळा लग्न (Wedding) झाल्यानंतर आपल्या जोडीदाराच्या उणिवा समोर येतात आणि आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. यासाठी लग्नाआधीच आपल्या मनातील शंका दूर होणं गरजेचं आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. आपला होणारा पती (Groom) अशिक्षित असल्याचं होणाऱ्या नवरीला कळलं आणि तीने भर मंडपात लग्न मोडलं.
काय आहे नेमकी घटना?
लग्नात सर्वात महत्वाची गोष्टी असते ती म्हणजे एकमेकांवरचा विश्वास. विश्वासावरच संपूर्ण आयुष्य टिकलेलं असतं. पण विश्वासाची जागा संशयाने घेतली की मात्र आयुष्यभर साथ देण्याची घेतलेली शपथ काही वर्षातच संपते. उत्तरप्रदेशमधल्या महोबा जिल्ह्यातील एक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. महोबा जिल्ह्यातील एका गावात एका मुलीने आपलं ठरलेलं लग्न मोडलं. लग्न जुळवताना मुलगा शिकलेला आणि चांगली कमाई करणारा असल्याचं मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना सांगण्यत आलं होतं. मुलाबद्दल त्याच्या कुटुंबियांकडून खोटी माहिती देण्यात आली होती.
मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी देखील यावर विश्वास ठेवत होकार कळवला. लग्नाची तारीख आणि वेळही ठरली. मंडप सजला. ठरलेल्या दिवशी नवरदेव वऱ्हाड घेऊन मुलीच्या दारी पोहोचला. पण म्हणतात काही घडण्याच्या आधी त्याचे संकेत मिळतात. असेच संकेत मुलीलाही मिळाले. तिला मुलाच्या शिक्षणाबद्दल संशय आला आणि तीने धाडस दाखवत मुलाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. लग्नाच्या आधी मुलीने मुलाला दोनचा पाढा म्हणण्यास सांगितला.
पण बे-एके-बेच्या पुढे मुलाला पाढा म्हणता येईना. बराच प्रयत्न करुनही मुलाला पाढा (Table) येत नसल्याचं लक्षात आलं. मुलगा अशिक्षित असून त्याने खोटी माहिती दिल्याचं उघड झालं. धक्कादायक म्हणजे हे लग्न हुंडा घेऊन जुळवण्यात आलं होतं. हुंड्यासाठी मुलगी आणि तिचं कुटुंब तयार झालं होतं, पण मुलगा अशिक्षित असल्याचं कळल्यावर मात्र मुलीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिच्या कुटुंबियांनी देखील तिला साथ दिली.
सोशल मीडियावर व्हायरल
उत्तर प्रदेशमधील ही घटना @shayar_yogi नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. सोशल मीडियावर ही घटना चांगलीच व्हायरल झाली असून लोकांनी मुलीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. लग्नानंतर पश्चाताप करण्यापेक्षा मुलीने वेळीच चांगलं पाऊल उचलल्याचं युजर्स म्हणतायत.