कोलकाता : भारतामध्ये तिहेरी तलाकविरोधात लढणारी मुस्लिम महिला इशरत जहाँ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी पश्चिम बंगालमधील हावडा भाजप कार्यालयात इशरत जहाँ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी इशरत जहाँ यांनी म्हटलं की, "जो माझं समर्थन करेल त्यांना माझं समर्थन असेल".


प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, तिहेरी तलाकविरोधात लढणारी आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या इशरत जहाँ यांचा शनिवारी भाजपने सन्मान केला. त्यानंतर इशरत जहाँ यांनी भाजपत प्रवेश केला.


पश्चिम बंगाल भाजप महासचिव सायंतन बसु यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, इशरत जहाँ यांच्या सन्मानासाठी लवकरच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.


पश्चिम बंगालमधील हावडा येथे राहणाऱ्या इशरत जहाँ यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकविरोधात याचिका दाखल केली होती. ३० वर्षीय इशरत जहाँ यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं की, मला दुबईतूनच पतीने फोनवरुन तलाक दिला होता.


इशरत जहाँ यांचा विवाह २००१ साली झाला होता आणि त्यांना ४ मुलं आहेत. माझ्या मुलांना पतीने जबरदस्तीने आपल्याकडेच ठेवलं असल्याचंही इशरत जहाँ यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. तिहेरी तलाक हा अवैधानिक आणि मुस्लिम महिलांच्या अधिकारांचा अपमान करत असल्याचंही याचिकेत इशरत जहाँ यांनी म्हटलं होतं.


तिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेमध्ये नुकतचं मंजूर करण्यात आलं आहे. अशाप्रकारे तलाक देणाऱ्या पतीला ३ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. याखेरीज दोषी पतीला दंड ठोठावण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.