आंदोलनाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकाराची हत्या
गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांवर होणारे हल्ले वाढत असल्याचं दिसत आहे. मात्र, पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात अद्याप कुठलीही ठोस योजना आखण्यात आलेली नाहीये.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांवर होणारे हल्ले वाढत असल्याचं दिसत आहे. मात्र, पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात अद्याप कुठलीही ठोस योजना आखण्यात आलेली नाहीये.
त्रिपुरामध्ये वार्तांकन करत असलेल्या एका पत्रकाराला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी इंडिजिनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) तर्फे आंदोलन करण्यात येत होतं. हे आंदोलन कव्हर करण्यासाठी स्थानिक टीव्ही पत्रकार शांतनु भौमिक तेथे दाखल झाला होता.
इंडिजिनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) आणि त्रिपुरा उपजाती गणमुक्ती परिषद या संघटनांमध्ये संघर्ष सुरु आहे. बुधवारी या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. त्याच दरम्यान वार्तांकन करण्यासाठी आलेल्या शांतनु याच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला.
या हल्ल्यात जखमी झालेल्या शांतनु याला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.