Trucks Cars To Fly Mid Air Video: वाहतुकीचे नियम पाळा असं अनेकदा सांगितलं जातं. वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात होण्याचं प्रमाण कमी होईल असं अनेकदा जनजागृतीदरम्यान ऐकायला मिळतं. मात्र केवळ वाहनचालकांनी किंवा पादचाऱ्यांनी वाहतुकीचे नियम पाळून अपघात टळतात हा गैरसमज असू शकतो असं सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे. हा व्हिडीओ एका रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये काढला आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या गाड्या आणि ट्रक एक रस्त्यावरील एका ठराविक ठिकाणी काही उंचीपर्यंत हवेत उडत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून आधी नेमका काय प्रकार आहे हे समजत नाही. मात्र नीट पाहिल्यास या गाड्यांबरोबर आणि ट्रकबरोबर असं नेमकं का होत आहे हे समजतं.


नेमकं घडतंय काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर व्हिडीओ हा दिल्लीजवळच्या गुरुग्राम येथील आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रात्री शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओत रस्त्यावरुन धावणाऱ्या चारचाकी गाड्या अचानक एका क्षणी काही उंचीपर्यंत उसळी घेताना दिसतात. केवळ चारचाकी गाड्या नाही तर ट्रकबरोबरही असाच प्रकार घडल्याचं व्हिडीओत दिसतं. मात्र नीट पाहिल्यास या गाड्या एका उंच स्पीड ब्रेकरवरुन हवेत झेपावत असल्याचं दिसून येतं. मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या स्पीड ब्रेकरवर गाड्या स्लो का होत नाहीत? तर हा स्पीड ब्रेकर अनमार्क म्हणजेच चिन्हांकित केलेला नाही. म्हणजेच या स्पीड ब्रेकरवर सामान्यपणे मारल्या जातात तशा पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारलेल्या नाहीत. त्यामुळे अंधारात चालकांना इथे स्पीड ब्रेकर आहे हे समजतच नाहीत. याच कारणामुळे वाहनाचा वेग कमी न करता भरधाव वेगात या उंचवट्यावरुन वेगाने वाहन गेल्यास जोरात धक्का बसून वाहन फूटभर तरी हवेत उडतं. 



कुठे आहे हा स्पीड ब्रेकर?


या व्हिडीओवर मयांक कोहली नावाच्या व्यक्तीने हा पटकन लक्षात न येणारा स्पीड ब्रेकर कुठे आहे हे सांगताना, "सेक्टर 54 च्या चौकातील मेट्रो स्टेशन आणि सेंट्रल प्लाझादरम्यान दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर हा स्पीड ब्रेकर आहे," असं सांगितलं. "आज सकाळीच हा स्पीड ब्रेकर पाहू हा किती धोकादायक आहे असा विचार मनात आला होता आणि आता इथे हा व्हिडीओ पाहतोय," असंही मयांका म्हणाला.



तुम्ही उडू नका...


अनेकांनी या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना या स्पीड ब्रेकरवरुन तुम्ही व्हिडीओत ज्या प्रकारे गाड्या उडत आहेत तसे उडू नका यासाठी शुभेच्छा देतो, असं म्हणत उपहासात्मक कमेंट केल्या आहेत. 



हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.