Ram Mandir Ayodhya: अयोध्येमध्ये तयार होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या आणि भव्य अशा राम मंदिरासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बरोबर एका वर्षानंतर म्हणजेच 2024 च्या मकर संक्रांतीला भगवान श्री रामाच्या बालक स्वरुपातील प्रतिमेची या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. 'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'चे महासचिव चंपत राय यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्यांनी ऑक्टोबर 2023 पर्यंत मंदिराच्या पाया, चौथरा आणि तीन स्तरांपैकी तळाचं बांधकाम काम पूर्ण होतील असं म्हटलं आहे. तसेच 2024 च्या मकर संक्रांतीला भगवान रामलल्लाच्या मंदिरामधील गर्भगृहामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाईल. आतापर्यंत जी तयारी झाली आहे त्यानुसार मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख 1 जानेवारी ते 14 जानेवारीदरम्यान असेल.


दिलेल्या वेळेआधीच पूर्ण होणार मंदिर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंपत राय यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मंदिर उभारणीचं काम युद्धस्तरावर सुरु आहे. पहिल्या तळाचं बांधकाम म्हणजेच पाया आणि त्यावरील चौथऱ्याचं काम ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये मूर्तीची स्थापना केली जाईल. अयोध्येमधील राम मंदिर हे नियोजित कालमर्यादेपेक्षा अधिक लवकर बांधून तयार होणार आहे. मंदिराच्या उभारणीचं काम वेगाने सुरु आहे. जवळजवळ 60 टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे. जानेवारी 2024 रोजी मंदिरातील गर्भगृहाचं काम पूर्ण करुन रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गर्भगृहामध्ये विराजमान होणारी भगवान श्रीरामाची मूर्ती कशी असेल? ही मूर्ती कशी दिसेल वगैरे यासारखे प्रश्नही तुम्हाला नक्कीच पडले असतील. या मूर्तीसंदर्भात जाणून घेऊयात.


कशी असणार रामलल्लाची मूर्ती


श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या 'भवन निर्मिती समिती'ची दर महिन्याला बैठक होते. या बैठकीमध्ये अनेक बारीकसारीक मुद्द्यांवर चर्चा केली जाते. यावेळी या बैठकीमध्ये भगवान श्रीरामाच्या मूर्तीचं स्वरुप कसं असेल याबद्दल चर्चा झाली. यावेळी रामभक्तांना अगदी 30 ते 35 फुटांवरुन भगवान श्रीरामाचं दर्शन घेता आलं पाहिजे एवढ्या उंचीची मूर्ती हवी यावर एकमत झालं. त्याचबरोबर रामलल्लाची मूर्ती ही पाच ते सात वर्षांच्या बालकाच्या रुपातील असेल असंही निश्चित करण्यात आलं आहे. तसेच या मूर्तीची बोटं कशी असतील, चेहरा कसा असेल, डोळे कसे असतील यासारख्या बाबींवर देशातील मोठमोठ्या मूर्तीकारांशी विचारमंथन सुरु आहे. ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार भगवान श्रीरामाची मूर्ती 8.5 फूट उंचीची असेल. ही मूर्ती घडवण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.


या तज्ज्ञांचा घेणार सल्ला; महाराष्ट्र कनेक्शन


नीलाम्बुज श्यामल कोमलांगम म्हणजेच गर्द निळ्या आकाशाप्रमाणे काया असलेला देव अशी प्रभू श्रीरामाची ओळख आहे. याच आधारावर श्रीरामाची मूर्ती तयार केली जाणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी 'नीलाम्बुज श्यामल कोमलांगम' या संज्ञेला अनुरुप अशी रामलल्लाची मूर्ती साकारली जाणार असल्याची माहिती दिली. मूर्ती बनवण्यासाठी अशा रंगाच्या दगडाची निवड केली जाणार आहे ज्याचा रंग आकाशासारखा असेल. तसेच महाराष्ट्रात आणि ओडिशामधील शिल्पकला क्षेत्रातील जाणकारांनी असा दगड आपल्याकडे उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले शिल्पकार मूर्तिचा आकार निश्चित करणार आहेत. यामध्ये ओडिशातील सुदर्शन साहू यांच्याबरोबर वासुदेव कामत तसेच कर्नाटकचे रमैया वाडेकर यासारख्या वरिष्ठ शिल्पकारांचा समावेश असणार आहे. सध्या ट्रस्टने या शिल्पकारांना शिल्पाची प्राथमिक चित्र तयार रेखाटण्यास सांगितलं आहे.


आधीच चित्र मग मूर्ती


रामल्लाच्या दर्शन भव्य मंदिरामध्ये ३५ फूट दुरुन करता येणार आहे. त्यामुळे देवाच्या पायापासून ते डोळ्यांपर्यंत सर्वच गोष्टीचं दर्शन भक्तांना सहज घेता येणार आहे. यासंदर्भातील वैज्ञानिक अभ्यास सुरु आहे. त्याशिवाय भगवान रामालल्लाची पाच वर्षांच्या बालकाच्या वयाची मूर्ती साकारण्याचा विचार सुरु आहे. भगवान रामलल्लाच्या मूर्तीचं आधी चित्र तयार केलं जाईल. यामध्येच अनेक बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष दिलं जाणार आहे. या चित्रावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मूर्ती बनवण्याचं काम हाती घेतलं जाईल. ९ इंचांपासून ते १२ इंचांपर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती तयार करुन ट्रस्टसमोर मंजुरीसाठी ठेवली सादर केली जाईल.


रामनवमीच्या दिवशी मस्तकावर सूर्यकिरणं


चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं जाईल की रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाच्या मूर्तीच्या मस्तकावर सूर्याची किरणं पडतील. या मूर्तीची उंची साडेआठ फुटांपर्यंत असावी असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.