ल्यूडो खेळताना वडिलांनी फसवल्यामुळे तरुणीची कोर्टात धाव
विश्वासाला गेला तडा
मुंबई : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक अजबच प्रकार घडला आहे. कोरोनाच्या काळात कुटुंबातील अनेक जण घरीच आहेत. अशावेळी वेळ घालवण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडले जातात. अशातच भोपाळमधील या कुटुंबियांनी वेळ घालवण्यासाठी ल्यूडो खेळ खेळला. पण हा खेळ खेळणं वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. या कुटुंबियातील मुलीने चक्क आपल्या वडिलांच्या विरोधातच फसवल्याच्या आरोपाखाली न्यायालयात धाव घेतली आहे.
ल्यूडो खेळताना वडिलांनी चीटिंग केल्याप्रकरणी मुलीने भोपाळमधील कौटुंबिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. २४ वर्षांच्या या तरूणीचा असा आरोप आहे की, ल्यूडो खेळताना तिच्या वडिलांनी खेळात फसवणूक केली आहे.
न्यायालयात काऊंसलर सरिता यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तरुणीचा आपल्या वडिलांवर एवढा विश्वास होता की, ते आपल्याला फसवतील असं तिला कधीच वाटलं नव्हतं. काऊंसलर यांनी सांगितलं की, या मुलीसोबत आम्ही चार सेशन केले आहेत.
तरूणीचं असं म्हणणं आहे की, या घटनेमुळे तिचा वडिलांवरचा विश्वास उडाला आहे. तिचा वडिलांप्रतीचा विश्वास आणि सन्मान कमी झाला आहे. कारण तिचे वडिल तिला हरवण्याच्या प्रयत्नात होते.
काऊंसलर म्हणाल्या की, त्या तरूणीला वाटतं होतं की, तिच्या वडिलांनी प्रेमाखातर हरलं पाहिजे. मात्र आता त्या तरुणीचा विचार बदलला आहे.