नवी दिल्‍ली : उत्तर प्रदेशच्या सहारनपुर जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे एका महिलेला रिक्षात बाळाला जन्म द्यावा लागल्याची संतापजनक घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील व्यवस्थेचं हे धक्कादायक रूप समोर आलं आहे. रूग्णालयातील कर्मचा-यांनी डिलेव्हरीसाठी आलेल्या महिलेवर उपचार करण्याऎवजी तिला बाहेर काढून दिलं. 


एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या गर्भवती महिलेला तिचे नातेवाईक दुस-या रूग्णालयात घेऊन जात असतानाच तिने रिक्षात बाळाला जन्म दिला. आता या महिलेला आणि तिच्या बाळाला एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारी जनकपुरी पोलीस स्टेशनात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.


१४ ऑगस्टच्या रात्री खजूरतलाच्या राहणा-या मोहम्मद रईसची पत्नी मुनव्वरला पोटात दुखत होतं. शेजारी महिला आणि कुटुंबियांनी मुनव्वरला जिल्हा रूग्णालयात दाखल केलं. मुनव्वरला पोटात अधिकच दुखू लागल्याने एखाद्या सिनिअर डॉक्टरने तिला बघावं असं कुटुंबियांना वाटत होतं. मात्र, आरोप आहे की, तिथे असलेल्या काही कर्मचा-यांनी डॉक्टरांना बोलवण्याऎवजी कोणतेही उपचार न करता मुनव्वरला धक्के देऊन बाहेर काढलं. 


दुस-या रूग्णालयात जाण्यासाठी मुनव्वर आणि कुटुंबिय रिक्षातून जात होते. काही वेळातच या रिक्षात तिने बाळाला जन्म दिला. मुनव्वर आणि तिचा मुलगा सुखरूप आहेत. त्यानंतर कुटुंबियांनी रूग्णालयातील कर्मचा-यांविरोधात तक्रार दाखल केली.