पंतप्रधान मोदींच्या संकल्पापुढे सर्व अफवा फेल, वीज पुरवठा सुरळीत
पंतप्रधानंच्या या आवाहनामुळे वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होईल अशी भीती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व जनतेला रविवारी रात्री ९ वाजल्यापासून पुढच्या नऊ मिनिटांपर्यंत घरातल्या सर्व लाईट बंद करून दारात तेलाचे दिवे, मेणबत्ती, मोबाईलचे लाईटस नऊ मिनिटासाठी, लावण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधानंच्या या आवाहनामुळे वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होईल अशी भीती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती. परिणामी दिवे बंद करण्याच्या आवाहनानंतर राज्यातील वीज पुरवठा सुरळीत असल्याची माहिती वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाविरोधात आणि यात सामिल असणाऱ्या लढाईत सामिल लोकांसोबत एकता दाखवण्यासाठी तसेच आभार व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आवाहन जनतेला केले होते. विजेचे दिवे बंद करण्यापूर्वी राज्यात रात्री ८.५५ दरम्यान विजेची मागणी ११ हजार ५०० मेगावॅट इतकी होती. तर, मुंबईत १७०० मेगावॅट इतक्या विजेची मागणी होती.
परंतु, ९ वाजता विजेचे दिवे बंद केल्यानंतर राज्यात विजेच्या मागणीत तब्बल ३००० मेगावॅटची घट झाली. मुंबईतही विजेच्या मागणीत सुमारे ४५० मेगावॅटची घट दिसून आली. फक्त महाराष्ट्रातच नाही इतर कोणत्याच राज्यात यामुळे पॉवर ग्रीडवर कोणताही परिणाम झाला नाही.
यात हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, महापालिका सेवा, उत्पादन सेवा, अत्यावश्यक सेवा यांच्यासाठी हे आवाहन नाही. पंतप्रधान यांचं आवाहन फक्त घरांसाठी असल्याचं सांगण्यात आलं होतं. स्थानिक प्रशासनाला स्ट्रीट लाईट सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.