पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर, गोव्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या नावावरून रात्रभर खल सुरू होता. मात्र, अद्याप भाजपा कुठल्याही निर्णयाप्रत आलेली नाही. मुख्यमंत्रिपदी नव्या चेहेऱ्याचीच निवड करण्यात यावी अशी मागणी, गोव्यातल्या भाजपा सरकारच्या मित्रपक्षांनी केली आहे. रिक्त झालेल्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजभवनमध्ये शपथविधी होईल अशी अटकळ बांधली जात आहे. रात्री दीड वाजता गडकरी गोव्यात पोहोचले. मुख्यमंत्री निवडीचा निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी गडकरींच्या नेतृत्वाखाली भाजपा राज्य कार्यकारिणीची बैठक गोव्यातील एका हॉटेलमध्ये झाली. या बैठकीत गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई, आमदार विनोद पालेयकर, जयेश साळगावकर यांच्यासह दोन अपक्ष आमदार रोहन खंवटे आणि गोविंद गावडे उपस्थित होते. बैठकीत भाजप महासचिव सतीश धोंड, अपक्ष आमदार आणि राज्याचे राजस्व मंत्री रोहन खौंते तसंच कला-संस्कृती मंत्री गोविंद गावेड हेदेखील उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदीन ढवळीकरही आपल्या दोन आमदारांसह गडकरींना भेटले. दरम्यान श्रीपाद नाईक आणि सुदीन ढवळीकर या दोघांची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. तर मायकल लोबो देखील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं समजतंय. त्यामुळे गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांच लक्ष लागलंय. 


अधिक वाचा :- गोव्यातील घडामोडींना वेग; दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार?


दुसरीकडे, मला भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. कुणीतरी स्वार्थासाठी ही कथा रचली आहे. माझा दिल्लीला जाण्याचा कार्य़क्रम दोन ते तीन दिवस आधीच निश्चित झाला होता असं वक्तव्य गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिगंबर कामत यांनी केलंय. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. त्यात दिगंबर कामत लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. ते भाजपात दाखल झाल्यानंतर त्यांची गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे अशी माहिती भाजपाच्या सूत्रांकडून देण्यात आली होती. दरम्यान दिगंबर कामत पक्ष सोडणार नाहीत, असा दावा गोवा काँग्रेसचे प्रवक्ते उरफान मुल्ला यांनी केलाय.