Crime News: दिल्लीमध्ये 25 वर्षीय नोकराची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जगनपुरा एक्स्टेंशन (Jangpura Extension) परिसरात तो काम करत असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. अमन तिवारी आणि जिर्जीस आझमी अशी या आरोपींची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल असं हत्या झालेल्या नोकराचं नाव आहे. गेल्या 3 वर्षांपासून तो त्या घरात नोकर म्हणून काम करत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हजरत निझामुद्दीन पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री आपल्या नोकराची हत्या झाल्याचा एक फोन आला होता. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बेडच्या बॉक्समध्ये हा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्याचे दोन्ही पाय आणि गळा प्लास्टिकने बांधण्यात आला होता. 


घराच्या चौथ्या माळ्यावर मृतदेह आढळला आहे. मात्र सर्व कर्मचारी दुसऱ्या माळ्यावर राहतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे की, आरोपी जिर्जिस हा आधी या मालकाकडे कामाला होता. पण एक महिन्यापूर्वी त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं. अॅडव्होकेट जनरल अमिक कुमार यांच्या कार्यालयात तो काम करत होता. 


कामावरुन काढून टाकल्याचा राग असल्याने आरोपीने घरमालकाच्या घरात चोरी करण्याचा कट आखला होता. यासाठी त्यांनी सर्वात आधी कमलची  इस्त्री आणि केबलच्या सहाय्याने निर्घृणपणे हत्या केली. नंतर त्यांनी मृतदेह बेडमध्ये टाकला. 


सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरातील दीपक नावाच्या दुसऱ्या नोकराला चौथ्या माळ्यावर जाणाऱ्या पायऱ्यांवर दोघे दिसले. त्याने विचारणा केली असता, आपण येथे नियमित पाण्याची तपासणी करण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. 


पण नंतर त्यांनी दीपकला आपल्या ताब्यात घेतलं आणि जबरदस्ती करत तिजोरीपर्यंत नेलं. त्यांनी दीपकला तिजोरीचा सेक्युरिटी कोड विचारला. पण त्याने देण्यात नकार दिला. यानंतर आरोपींनी चाकूने भोसकून त्याच्यावर हल्ला केला. 


यानंतर मालकाचा मुलगा आदित्य याला घरात काहीतरी गडबड सुरु असल्याचं लक्षात आलं. तो धावत दुसऱ्या माळ्यावरुन तिसऱ्या माळ्यावर आला. यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. दीपक हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


पोलिसांना सुरुवातीला कमलनेच दीपकवर वार केल्याचा संशय होता. कारण घटनेनंतर तो बेपत्ता  होता. पण नंतर बेडच्या ट्रंकमध्ये त्याचा मृतदेह आढळल्यानंतर तपासाची दिशा वळाली.


पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच सीसीटीव्हीच्या आधारे दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.