दोन बड्या नेत्यांमधील मतभेदांमुळे तृणमूल काँग्रेस आणि ममतांचं टेन्शन वाढलं
तृणमूल काँग्रेसच्या समस्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये.
कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या समस्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पक्षाचे मोठे नेते आणि मंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या बंडखोरीनंतर आता तृणमूलचे दोन ज्येष्ठ मंत्री रवींद्रनाथ भट्टाचार्य आणि आमदार बेचारम मन्ना यांच्यातील मतभेद सिंगूरमध्ये उघड झाले आहेत. या दोन्ही नेत्यांनी सिंगूर चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एकीकडे या मतभेदांमुळे रवींद्रनाथ भट्टाचार्य यांनी पक्ष सोडण्याची भाषा केली आहे, तर बेचरम मन्ना यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. तृणमूल सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्या सूचनेनुसार पक्षाचे काही ज्येष्ठ नेते मतभेदाचे हे निराकरण करण्याचे प्रयत्न करत आहेत.
सिंगूर चळवळीत ममतासमवेत असलेले रवींद्रनाथ भट्टाचार्य यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. सिंगूरमधील टाटाच्या नॅनो कारखान्याविरूद्धच्या चळवळीत भट्टाचार्य यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याचवेळी, आमदार बेचारम मन्ना देखील सिंगूर चळवळीत खूप सक्रिय होते. पुन्हा एकदा रवींद्रनाथ आणि बेचरम यांच्यातील वाद अधिक वाढला आहे. मन्ना यांनीही आमदारपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
तृणमूलच्या नेतृत्वाने मन्नाशी नाराजी दूर केल्यानंतर आता रवींद्रनाथ नाराज आहेत. कारण, त्यांचे निकटचे तृणमूल ब्लॉक अध्यक्ष महादेव दास यांना ममता बॅनर्जी यांनी पदावरून काढून टाकले आहे. हुगळी जिल्ह्यातील हरिपाल ब्लॉकमध्येही असाच बदल करण्यात आला ज्यामुळे मन्नाही संतापले होते. याक्षणी मन्ना यांची नाराजी दूर झाली आहे. पण रवींद्रनाथ नाराज आहेत.
पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वी तृणमूलमधील संघर्ष हे ममतांसाठी शुभ संकेत नाही. ज्या प्रकारे नंदीग्राम आणि सिंगूर या दोन्ही राज्यांमधील राजकीय समीकरणे बिघडू लागली आहेत. ज्यामुळे आगामी निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला धक्का लागू शकतो.