`लिव्ह इन`मध्ये राहणाऱ्या वडिलांची मुलांकडून हत्या
दोघांच्या प्रेमात कोणी तिसऱ्या व्यक्तिने व्हिलन ठरणे समाजाला नवे नाही. उत्तर प्रदेशमध्ये एक खळबळजन घटना घडली.
नवी दिल्ली : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, तसंच, प्रत्येकाचं प्रेम अनेकांना रूचलंच जातं असंही नसतं. त्यामुळे दोघांच्या प्रेमात कोणी तिसऱ्या व्यक्तिने व्हिलन ठरणे समाजाला नवे नाही. उत्तर प्रदेशमध्ये एक खळबळजन घटना घडली. ज्यात चक्क पोटची मुलेच बापाच्या प्रेमात व्हीलन म्हणून आली. ही मुले बापाच्या प्रेमात केवळ व्हिलनच झाली नाहीत तर, त्यांनी लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या बापाचा आणि त्यांच्या प्रेयसीचीसुद्धा हत्या केली.
घटना आहे उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील हर्रेया परिसरातील. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महुघाट येथे राहणारे नागरिक हृदयराम आणि परिसरातच राहणारी महिला सुनिता यांच्यात प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र, आपल्या वडिलांची मालमत्ता प्रेमाच्या वेडात संबंधीत महिलेला मिळू शकते, असा राग हृदयराम यांच्या मुलांच्या मनात होता. त्यातूनच सुनिता हिचा हृदयराम यांच्या मुलांसोबत वाद शुक्रवारी झाला. हृदयराम यांना राजेंद्र आणि राजेश अशी दोन मुले आहेत.
दरम्यान, सुनिता आणि राजेंद्र व राजेश यांच्यात टोकाचा वाद सुरू असलेले पाहून मध्यस्थी करण्यासाठी हृदयराम या भांडणात उतरले. मात्र, टोकाचा राग डोक्यात गेलेल्या राजेंद्र आणि राजेश यांनी सुनिता आणि हृदयराम यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेत सुनिता आणि हृदयराम यांचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या मालमत्तेच्या वारसाच्या वादातून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.
घटनेनंतर आरोपी राजेंद्र आणि राजेश यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हृदयराम यांचा बिल्डिंग कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तसेच, महुघाट येथे 40 दुकानांचा एक कॉम्प्लेक्सही आहे. सुनिता ही परित्कात होती. अपत्य होत नसल्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले होते. पुढे तिचे हृदयरामसोबत प्रेमसंबंध जूळले. एक वर्षभरापूर्वीच हृदयरामच्या पत्नीचे निधन झाले होते.
दरम्यान, पोलीस प्रकरणाचा पुढिल तपास करत आहेत.