बंगळुरू: कर्नाटकमधील काँग्रेसच्या दोन आमदारांनी सोमवारी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने येथील राजकीय परिस्थिती पुन्हा अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. आनंद सिंह आणि रमेश जारकिहोली अशी राजीनामा देणाऱ्या आमदारांची नावे आहेत. या दोघांनीही सोमवारी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला. त्यामुळे ११३ जागांच्या कर्नाटक विधानसभेतील काँग्रेसचे संख्याबळ ७८ वर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन्ही आमदारांनी अद्याप राजीनामा देण्यामागील कारण स्पष्ट केलेले नाही. हे दोन्हीही आमदार लवकरच राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतील. यापैकी रमेश राजकिहोली यापूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, भाजपशी लागेबांधे असल्यामुळे राहुल गांधी त्यांच्यावर नाराज होते. परिणामी दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर रमेश जारकिहोली यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. तेव्हापासूनच जारकिहोली हे पक्षानवर नाराज होते. 


तर आनंद सिंह यांनीदेखील सरकारच्या एका निर्णयावर पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती. कर्नाटक सरकारकडून जेएसडब्ल्यूला नुकतीच ३,६६७ एकर जमीन विकण्यात आली होती. या निर्णयाला आनंद सिंह यांनी विरोध केला होता. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. 


मात्र, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के.आर. रमेश कुमार यांनी मात्र आपल्यापर्यंत असा कुठलाही राजीनामा पोहोचल्याचे नाकारले आहे. मला कोणाचाही राजीनामा मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले. 


या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी भाजपवर टीका केली आहे. कुमारस्वामी हे सध्या अमेरिकेत आहेत. मात्र, मी राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भाजप कर्नाटक सरकार अस्थिर करण्याची स्वप्ने दिवसाढवळ्या पाहत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 


दरम्यान, या सगळ्या घडामोडींमुळे कर्नाटकात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपच्या दाव्यानुसार काँग्रेसचे आणखी सहा आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस- सेक्युलर जनता दलाचे सरकार अडचणीत आले आहे.