संसदेत कामकाज करायचेय, तर हे दोनच पर्याय आहेत- व्यंकय्या नायडू
लोकांनी निवडून दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी स्वत:च्या मार्गाने चालणे गरजेचे आहे
नवी दिल्ली: संसदेत कामकाज करायचे असेल तर तुम्ही एकतर चर्चा करु शकता, नाहीतर बहिष्कार टाकू शकता. या दोन्हींशिवाय दुसरा पर्यायच अस्तित्त्वात नाही. परंतु, तुम्ही संवाद तोडू शकत नाही. अन्यथा लोकशाही व्यवस्था मोडीत निघेल, असे मत उपरराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
ज्याप्रमाणे विरोधकांना त्यांचे म्हणणे सभागृहात मांडायचा अधिकार आहे, तसाच अधिकार सत्ताधाऱ्यांनाही आहे. विरोधकांचे काहीही म्हणणे असले तरी लोकांनी निवडून दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी स्वत:च्या मार्गाने चालणे गरजेचे आहे, असे नायडूंनी सांगितले.
व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी उपराष्ट्रपतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या काळात शेती, शिक्षण, तरुणाई, विज्ञान या अनुषंगाने देशातील विविध घटकांशी अर्थपूर्णरित्या संवाद साधता आला, असे नायडूंनी म्हटले. उपराष्ट्रपतीपदाच्या एक वर्षाच्या काळात व्यंकय्या नायडू यांनी देशातील २९ पैकी २८ राज्यांना भेट दिली. याशिवाय, त्यांनी तीन दक्षिण अमेरिकन देशांचे दौरेही केले.