मंगलुरुमध्ये एका प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये डुबून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगलुरुच्या उचिला बीचजवळ असलेल्या एका प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये हा प्रकार घडला आहे. तीन मुलींमध्ये 21 वर्षीय निशिता एमडी, 20 वर्षांची पार्वती आणि 21 वर्षांची किर्तना यांचा समावेश आहे. या धक्कादायक प्रकरणाने मुलींच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या तिन्ही मुली मैसूरच्या असल्याचं सांगितलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिन्ही मुली निशिता, पार्वती आणि किर्तना 16 नोव्हेंबर रोजी रिसॉर्टला गेल्या. येथे त्यांनी एक रुम घेतला होता. तिघींमधील निशिता स्विमिंग पूलमध्ये गेली होती. पण तिला पोहता येत नाही. पूलमध्ये उतरल्यानंतर निशिता दिसेनाशी झाली. त्यानंतर पार्वती तिला पाहण्यासाठी स्वतः पूलमध्ये उतरली. पण निशिताला वाचवण्यासाठी पूलमध्ये उतरलेली पार्वती बुडू लागली. दोघींना बघून तिसरी मैत्रिण किर्तना देखील स्विमिंग पूलमध्ये गेली. पण त्या दोघींना वाचवण्यासाठी गेलेली किर्तना देखील स्विमिंग पूलमध्ये बुडाली.



तिघींचा मृत्यू 


यानंतर पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली. मंगलुरु पोलीस कमिश्नर अनुपम अग्रवालने घटनास्थळी जावून भेट दिली. रविवारी सकाळी दहा वाजता या तिन्ही मुली स्विमिंग पूलमध्ये उतरल्या होत्या. एका मुलीला पोहता येत नव्हतं. आणि तिला वाचवायला गेलेल्या दोघी देखील बुडू लागल्या. या दुर्घटनेत तिघींचा मृत्यू झाला आहे. 


खाजगी रिसॉर्ट सील


त्यांनी पुढे सांगितले की, तिन्ही मुली म्हैसूर येथील रहिवासी आहेत आणि त्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. रिसॉर्टमध्ये लाईफ गार्ड नव्हता. माहिती फलकावर खोलीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातानंतर पोलिसांनी रिसॉर्ट मालक मनोहरसह दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. रिसॉर्टची परवानगी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी ते सीलबंद ठेवले आहे. रिसॉर्टमधील त्रुटींमुळे ते सील करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.