राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आपल्या खासदारकीचा राजीनामा मध्यरात्री दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. उदयनराजे भोसले यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थित आज दिल्लीत प्रवेश केला.
यावेळी उद्यनराजे म्हणालेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव स्थापित केला. त्यानुसार देश पुढे चालू आहे. शिवाजी महाराजांचा विचार घेऊन मोदी शाह पुढे जात आहेत. प्रत्येक राज्यांत भाजपची प्रगती होत आहे. त्याचे कारण हेच आहे. मी लहान असल्यापासून काश्मीरचा मुद्दा ऐकतोय. त्याकडे कोणी नीट पाहीले नाही. देश एकत्र कसा राहील, अखंडता टिकून कशी राहील, यासाठी भाजप सरकारने पाऊल उचलले. हा निर्णय एकदम योग्य आहे. दरम्यान, उदयनराजे यांनी काश्मीर मुद्द्यांवर भाजपला पाठिंबा दिला. प्रवेश करण्याचे कारण काश्मीर प्रश्न सोडवला, असल्याचे सांगितले.
साताऱ्यात राष्ट्रवादीचे एकहाती सत्ता होती. या सत्तेला आता सुरुंग लागणार आहे. भाजपने उदयनराजे भोसले यांना गळाला लावून पश्चिम महाराष्ट्रात आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्याच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हेदेखील उपस्थितीत होते. त्यानंतर आज सकाळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी उदयनराजे भोसले हे एक होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, साताऱ्यात आता पोटनिवडणूक पार पडणार असून ती विधानसभेबरोबर पार पडेल किंवा त्यानंतर हे पाहावे लागणार आहे. परंतु हा गड आपल्याकडे राखणे हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे. यापूर्वी उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे.