`फसलेल्या नोटबंदीनंतर पंतप्रधान कोणतं प्रायश्चित घेणार?`
शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय.
मुंबई : नोटबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेत जवळपास सगळ्याच नोटा परत आल्याचं वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाल्यावर मोदी सरकारवर चौफेर टीका सुरू झाली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. सामनाच्या अग्रलेखात रिझर्व्ह बँकेला झिंगलेल्या माकडाची उपमा देण्यात आलीय. नोटबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवसात परिस्थिती सुधारली नाही, तर भर चौकात जी शिक्षा द्याल ती भोगेन असं मोदींनी म्हटलं होतं. त्यामुळे सपशेल फसलेल्या नोटबंदीनं आता पंतप्रधान कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? असा प्रश्नही सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आलाय.
काय म्हटलंय 'सामना'त
रिझर्व्ह बँक ही देशाच्या अर्थव्यवस्थेची संरक्षक असते. विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झाले आहे. नोटाबंदीच्या निमित्ताने देशप्रेमाचे धडे देण्यासाठी ‘भगतगण’ पुढे पुढे करीत होते. मात्र ‘झिंगलेल्या माकडा’लाही नोटाबंदीचे ‘सत्य’ लपवणे अवघड झाले आणि हे ‘वास्तव’ त्याच्या अहवालातून समोर आले. नोटाबंदी हा फियास्कोच होता हे ‘झिंगलेल्या माकडा’नेच मान्य केले आहे. झिंगलेल्या माकडाची ही गोष्ट आहे. ती लिहिणे इसापलाही जमले नसते, असं अग्रलेखाच्या मथळ्यात म्हटलं गेलंय.
तर सपशेल फसलेल्या नोटाबंदीने देशाला आर्थिक अराजकात ढकलले. त्यामुळे देशाला दिलेल्या वचनास जागून पंतप्रधान मोदी हे आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? असा प्रश्नही यातून विचारण्यात आलाय.
नोटाबंदी’ हा अघोरी प्रयोग होता व त्यामुळे देशाचे सवादोन लाख कोटींचे नुकसान झाले. हा भ्रष्टाचार आहे. देशाच्या तिजोरीची लूट आहे व रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी ही लूट रोखली नाही म्हणून त्यांना न्यायासनासमोर उभे केले पाहिजे. रिझर्व्ह बँक ही देशाच्या अर्थव्यवस्थेची संरक्षक असते. विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झाले आहे, असं म्हणत शिवसेनेनं आरबीआय प्रशासनावरही ताशेरे ओढलेत.