अयोध्या : 'आशीर्वाद उत्सव'साठी अयोध्येत पोहोचलेल्या उद्धव ठाकरे यांनी नुकतेच रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत यावेळी पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील होते. दर्शन घेतल्यानंतर ते हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'अयोध्येमध्ये राम मंदिर होत, आहे आणि राहिलं पण दिसतं नाहीयं. अयोध्येत राम मंदिराचे निर्माण लवकरात लवकर व्हायला हवं. राम मंदिर बनविण्यासाठी सरकारला अध्यादेश आणायला हवा', असं ते म्हणाले.


'..तर सरकार बनणार नाही'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारकडून राम मंदिर उभारण्यात येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही. मात्र, राममंदिर जरुर बनेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिलाय. रामजन्मभूमीवर रामलल्लाचं सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव बोलत होते.


जगभरातल्या हिंदूंच्या भावनांशी न खेळता राममंदिरासाठी अध्यादेश आणा, कायदा करा किंवा काहीही करा. मात्र मंदिर लवकरात लवकर उभारा अशी मागणी उद्धव यांनी केलीय. अयोध्या दौऱ्यामागे कोणताही छुपा अजेंडा नसल्याचं स्पष्टीकरणही उद्धव यांनी दिलंय.


तसंच रामचंद्राची तुरुंगवासातून मुक्तता करण्याची मागणी करत उद्धव यांनी भाजपाला टोला लगावलाय. 


मंदिर वही बनायेंगे असं वारंवार म्हटलं जात पण बनवणार कधी ? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. 


हिंदुत्व मार खाणार नाही किंवा शांतही बसणार नाही' असे सांगत हिंदुच्या भावनांशी खेळू नका असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.


शनिवारी उद्धव यांनी अयोध्येत संतांच्या भेटी घेतल्या.


श्रीराम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांना राम मंदिरासाठी चांदीची वीट भेट देखील दिली.


कडक सुरक्षा व्यवस्था


अयोध्येत सुरक्षा व्यवस्था कमालीची वाढवण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलंय. त्याच बरोबर विहिंपकडून धर्मसभेचे आयोजन करण्यात आलंय.


कारसेवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने अयोध्येत असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आलीय.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला हिंदी वर्तमान पत्रात ठळक प्रसिद्धी मिळाली आहे.



विहिंपची जय्यत तयारी 


रविवारी होणाऱ्या धर्मसभेसाठी विश्व हिंदू परिषदेचीही जय्यत तयारी सुरूय. या धर्मसभेसाठी ८० फूट लांब व्यासपीठ तयार आहे. या व्यासपीठावर जवळपास दीडशेहून अधिक साधू, संत आणि महंत विराजमान होणारयत. इथं येणाऱ्या रामभक्तांची संख्या दोन लाखांच्या आसपास असेल असा अंदाज विहिंपनं वर्तवलाय. त्यानुसार या धर्मसभा स्थळावर व्यवस्था करण्यात आलीय.