PM Modi  Home Minister Ami Shah: जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही आठवड्यांपासून वारंवार होणाऱ्या दहशतावादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाने जम्मूमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांचा उल्लेख करत 'जम्मूतील हत्यासत्र' असं म्हणत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामाच मागितला आहे.


पंगू सरकार वाचवण्यासाठीच...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"देशात आजघडीला सरकार नावाची चीज अस्तित्वात आहे काय व असेल तर ती नेमकी काय करीत आहे?" असा सवाल ठाकरे गटाने 'सामना'तील अग्रलेखाच्या सुरुवातीलाच विचारला आहे. "कालपर्यंत केवळ कश्मीर खोऱ्यापुरत्या सीमित असलेल्या दहशतवादी हल्ल्यांनी आता जम्मूमध्ये रोजच धुमाकूळ चालवला असताना देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री व संरक्षणमंत्री काय करीत आहेत?" असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे. "देशातील राजकीय विरोधकांना दुश्मन मानून त्यांना संपवण्यात व कुबड्यांवरील पंगू सरकार वाचवण्यासाठीच सगळी शक्ती खर्च करण्यात सरकार मश्गुल असताना देशाचे खरेखुरे शत्रू मात्र मोकाट सुटले आहेत," असा टोला लेखातून लगावण्यात आला आहे.


खरे दुश्मन सोडून सरकार आपली सर्व शक्ती 'इथे' खर्च करत आहे


"सोमवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लष्कराच्या जवानांवर भीषण हल्ला केला. डोडा जिल्ह्यातील जंगलात काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-कश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने तिकडे धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली असता अतिरेक्यांनी या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात लष्कराच्या एका कॅप्टनसह 4 जवान शहीद झाले. पोलीस दलाचेही 5 जवान गंभीर जखमी झाले आहेत. डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर केलेला हा तिसरा हल्ला आहे. एप्रिल महिन्यापासून सोमवारी 16 जुलै रोजी झालेल्या ताज्या हल्ल्यापर्यंतची आकडेवारी पाहिली तरी या शंभरेक दिवसांत जम्मू विभागात तब्बल 10 दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये 12 जवान शहीद झाले, 10 नागरिक मृत्युमुखी पडले, तर अतिरेकी मात्र केवळ पाच मारले गेले. कश्मीर खोऱ्यातील दहशतवाद जम्मूपर्यंत येऊन पोचला असताना 56 इंची छातीचा ऊर बडवणारे सरकार देशाच्या दुश्मनांशी दोन हात करण्याऐवजी आपल्या राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत कसे करता येईल, यावरच आपली सगळी शक्ती खर्च करीत आहे," अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.


...तर हे हत्यासत्र पाहण्याची वेळ आपल्यावर आली नसती


"जम्मूमध्ये पुनः पुन्हा जवानांच्या रक्ताचा सडा पडत असताना देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांचे अस्तित्व कुठेच जाणवत नाही. निवडणुका मॅनेज करणे, काठावरचे बहुमत वाढवण्यासाठी नवनव्या योजना आखणे, खोकेशाहीच्या माध्यमातून व धाकदपटशा दाखवून विरोधी पक्षांची सरकारे पाडणे व त्यासाठी सरकारची सगळी ताकद पणाला लावणे, या नसत्या उद्योगांमध्येच सरकारचा सगळा वेळ आणि शक्ती खर्च होत आहे. राजकीय विरोधकांऐवजी देशाच्या खऱ्या दुश्मनांना खतम करण्यासाठी सरकारने ही ताकद लावली असती तर जम्मू-कश्मीरमध्ये सुरू असलेले जवानांचे हत्यासत्र हतबलपणे पाहण्याची वेळ आज आपल्यावर आली नसती," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.


सरकारचे भंपक दावे


"पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्धात कशी शिष्टाई केली, वगैरे बढाया हे सरकार कायम मारत असते. मग जम्मू-कश्मीरातील वाढते दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी पंतप्रधान हीच धमक का दाखवत नाहीत?" असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. "जम्मू-कश्मीरातील दहशतवाद आम्ही संपुष्टात आणला, 370 कलम हटवल्यामुळे आता दहशतवादाला थाराच उरणार नाही, असे भंपक दावे हे सरकार करत असते. तथापि, हे दावे किती पोकळ आहेत, हे जम्मूत वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांतून पुनः पुन्हा सिद्ध होत आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.


किती लष्करी अधिकारी व जवान आपण पुनः पुन्हा गमावणार?


"कालपर्यंत केवळ ‘अशांत कश्मीर खोऱ्यापुरते मर्यादित असलेले पाकिस्तान समर्थित दहशतवादी हल्ले आता तुलनेने ‘शांत’ समजल्या जाणाऱ्या जम्मू भागात सुरू झाले आहेत. गेल्या 20 वर्षांपासून सुरक्षित असलेल्या जम्मूमध्ये प्रथमच सुरू झालेले दहशतवादी हल्ले ही या सरकारचीच उपलब्धी किंवा देण आहे. 4 मे रोजी पूंछमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात वायुदलाचा जवान शहीद झाला, 9 जून रोजी रियासी येथे भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 9 जण मृत्युमुखी पडले, 11 जून रोजी कठुआमधील चकमकीत 1 जवान शहीद झाला, एप्रिलमध्येही अतिरेक्यांनी 2 जणांची हत्या केली. एकच आठवड्यापूर्वी 8 जुलै रोजी कठुआमध्ये लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. त्यानंतर सोमवारी पुन्हा कॅप्टन ब्रजेश थापा यांच्यासह चार जवान दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाले. जम्मूमध्ये सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे लष्कराच्या अधिकारी व जवानांचे रक्त रोजच सांडत आहे. शहीद अधिकारी व जवानांच्या शवपेट्या त्यांच्या गावात पोहोचत आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कधी लढून तर कधी लढण्याची संधीही न मिळता लष्कराच्या अधिकारी व जवानांना वीरमरण येत आहे. असे किती लष्करी अधिकारी व जवान आपण पुनः पुन्हा गमावणार आहोत?" असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.


अमित शाहांचा राजीनामा घ्या


"शहीद होणाऱ्या जवानांचे हे हौतात्म्य असले तरी सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेल्या या हत्याच आहेत व त्याची लाज या सरकारला वाटायला हवी. जम्मूमधील वाढते दहशतवादी हल्ले व लष्करी अधिकारी, जवानांचे सलग सुरू असलेले लाजिरवाणे हत्यासत्र हे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचे अपयश आहे व नैतिकतेच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्यायलाच हवा!" असं लेखाच्या शेवटी ठाकरे गटाने म्हटलं आहे.