`मोदींनी देव बदलल्याचा...`, `रामाचा नवा वनवास` म्हणत ठाकरेंच्या सेनेची अयोध्येवरुन कठोर शब्दांत टीका
Shivsena Slams PM Modi modi Over Ram Mandir: लोकसभा निकालानंतर मोदी एकदाही अयोध्येत गेले नाहीत. ज्या राममंदिराचा जप मोदी अष्टौप्रहर करीत होते त्यांनी रामाचे नावच टाकले हा कसला परिणाम? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.
Shivsena Slams PM Modi modi Over Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडलं आहे. "राममंदिर आता भाजपच्या कामाचे राहिलेले नाही. राममंदिराचा आता राजकीय फायदा राहिलेला नाही. त्यामुळे हा विषय गुंडाळून ठेवण्याचा निर्णय भाजपच्या ‘थिंक टँक’ म्हणजे शहाणपण वाटप महामंडळाने घेतलेला दिसतोय. 2024 च्या निवडणुकीआधी राममंदिराच्या लोकार्पणाची घाई नरेंद्र मोदी यांना झाली होती. लोकसभा निवडणुकीत ‘आम्ही राममंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण केले’ अशा घंटा त्यांना प्रचारात वाजवायच्या होत्या व त्यासाठी त्यांनी अर्धेमुर्धे राममंदिर ताब्यात घेऊन लोकार्पण सोहळा साजरा केला. जगभरातल्या व्यक्ती, उद्योगपती, अभिनेते वगैरेंना बोलावून मंदिराचा इव्हेंट घडवला, पण लोकसभा निवडणुकीत मोदींना श्रीराम काही पावला नाही. उत्तर प्रदेशातच भाजपचा दारुण पराभव झाला. प्रत्यक्ष अयोध्येतच मोदींना पराभवाचा झटका बसला. त्यामुळे मोदींनी रामाचे नाव टाकले व त्यांनी आपला मोर्चा ओडिशाच्या जगन्नाथ देवाकडे वळवला. मोदींनी देव बदलल्याचा फटका राममंदिरास बसला असून राममंदिर पूर्ण होण्याचा कालावधी त्यामुळे लांबला आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
रामसेतू बांधण्यासाठी वानर पुढे आले व इथे मंदिरासाठी मजूर नाहीत
"अयोध्येतील राममंदिराचे काम जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते, पण आता त्यास विलंब लागेल असे बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी जाहीर केले. मंदिर कामास कुशल मजूर वर्ग लागतो. त्यांचा तुटवडा आहे. दोनशे मजुरांची कमतरता आहे. राममंदिर कार्यासाठी मजूर मिळत नाहीत व त्यामुळे मंदिर निर्माण लांबले. हिंदुत्वाचा हा घोर अपमान वगैरे आहे असे कुणास वाटत नाही काय? भाजप राजवटीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून पडतो व अयोध्येत राममंदिराचे कार्य पूर्णत्वास जात नाही. यास कसले हिंदुत्व म्हणायचे? मजुरांची वानवा आहे हे कारण राम मंदिर विलंबासाठी दिले जाते. ज्या मंदिर निर्माणासाठी 25-30 वर्षे दगड तासण्याचे काम संघ परिवाराने हाती घेतले होते, त्यास मजुरांची वानवा पडावी? अयोध्येत कारसेवेसाठी लाखो रामभक्त जमत होते व आता मोदी काळात मंदिरासाठी 200 मजूर मिळत नाहीत? रामसेतू बांधण्यासाठी वानर पुढे आले व इथे मंदिरासाठी मजूर नाहीत. मोदी यांच्या काळात हिंदुत्वाची ही अशी दशा झालेली दिसते," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
अयोध्येत सध्या काय परिस्थिती?
"मंदिराचे लोकार्पण होताच पहिल्या पावसात मंदिर गर्भगृहावरच गळू लागले. त्यामुळे मंदिराच्या पुजाऱ्यांना रामावर छत्री धरून उभे रहावे लागले. आता ही गळती थांबवण्यासाठी मंदिराचे छतावरील दगड बदलावे लागतील. फक्त सहा महिन्यांत मंदिराची ही अवस्था का व्हावी? मंदिराला अद्याप कुंपण पडू शकलेले नाही. कुंपणासाठी 8.5 लाख घनफूट लाल ‘बंसी पहाडपूर’ दगड येऊन पडला आहे, पण मजूरच उपलब्ध नसल्याने या दगडांचे फक्त ढिगारे अयोध्येत पडले आहेत. मंदिर पूर्ण का होत नाही? याचे कारण भाजपसह मोदींचे मंदिरावरील मन उडाले आहे. मजूर नाहीत वगैरे बहाणे आहेत. सभागृह, कुंपण, प्रदक्षिणा मार्ग यांचे काम सुरूच झाले नाही. मंदिरात मूर्ती आणून एक राजकीय उत्सव करायचा होता. तेवढ्यापुरते बांधकाम घाईने उरकले व मोदी त्या काळात मिरवामिरव करून गेले. मंदिराच्या लोकार्पणावर चारही शंकराचार्य व धर्माचार्यांनी बहिष्कार टाकला. अर्धवट अवस्थेतील मंदिराचे लोकार्पण करणे हिंदू धर्मशास्त्रविरोधात आहे असे शंकराचार्यांचे म्हणणे होते, पण त्या काळात मोदी हेच शंकराचार्य बनले व प्रभू श्रीरामांचे बोट पकडून मोदी त्यांना मंदिरात नेत असल्याची पोस्टर्स देशभरात झळकवली. मंदिराच्या ट्रस्टवरही भाजपने आपली माणसे चिकटवून अयोध्येवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मंदिराचे राजकारण कोसळून पडले," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
नवा वनवास सुरू झाला आहे काय?
"मंदिर निर्माणानंतर त्याचा प्रभाव आठ दिवसही टिकला नाही व लोकसभेत योगींसह मोदी व मंदिराचे राजकारण चक्रव्यूहात सापडले. राममंदिराचे राजकारणच चालत नाही म्हटल्यावर मोदी-शहांच्या तोंडून रामनाम येणेही बंद झाले. लोकसभा निकालानंतर मोदी एकदाही अयोध्येत गेले नाहीत. ज्या राममंदिराचा जप मोदी अष्टौप्रहर करीत होते त्यांनी रामाचे नावच टाकले हा कसला परिणाम? राममंदिर निर्माणातील मोदींचा ‘राजकीय इंटरेस्ट’ संपल्याचा परिणाम असा झाला की, राममंदिराचे काम रखडून पडले. मोदीसाहेबांनी देव बदलला. त्यामुळे भाजपने देव फिरवला. श्रीराम पुन्हा वनवासी होतात की काय, अशी भीती त्यामुळे निर्माण झाली. मोदी यांच्यामुळे श्रीरामास निवास मिळाल्याचे शंख फुंकणारे आता गायब झाले. रामाची निवास व्यवस्था अपुरी आहे. रामाचे छत गळते आहे व घराला कुंपण नाही. दरबाराचे कामही अपूर्ण. त्यामुळे रामाची अवस्था अवघडल्यासारखी झाली. दिल्लीच्या राजाने देव बदलल्याचा फटका अयोध्येच्या राजाला बसला. भाजपला आता श्रीराम नकोसे झाले! रामाचा नवा वनवास सुरू झाला आहे काय?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने लेखाच्या शेवटी केला आहे.