नवी दिल्ली: वायव्य दिल्लीतून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले भाजपचे विद्यमान खासदार उदित राज यांनी बुधवारी पक्षाला रामराम ठोकला. उदित राज यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. उदित राज यांनी म्हटले की, भाजप हा दलितविरोधी पक्ष आहे. याठिकाणी तुम्ही शांत बसलात तरच तुमच्या पदरात काहीतरी पडते. भाजपला दलितांची मते हवीत पण दलित नको, असा आरोपही त्यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी उदित राज यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासंदर्भातही एक धक्कादायक खुलास केला. उदित राज यांनी सांगितले की, २०१४ साली भाजपने रामनाथ कोविंद यांनाही तिकीट नाकारले होते. मात्र, तरीही ते शांत बसून राहिले. त्याचे इनाम म्हणून रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली. मध्यंतरी देशभरात झालेल्या दलित संघटनांच्या निदर्शनांना पाठिंबा दर्शवला नसता तर भाजपने मलाही पंतप्रधान केले असते, असे उदित राज यांनी सांगितले. 


वायव्य दिल्लीतून गायक हंस राज हंस यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार असलेले उदित राज नाराज झाले होते. भाजपने उमेदवार निवडीपूर्वी अंतर्गत सर्वेक्षण केले होते. त्यामध्येही मतदारांनी माझ्या नावाला पसंती दिली होती. परंतु, मी दलित निदर्शनांना पाठिंबा दर्शवल्यामुळे माझे तिकीट कापण्यात आले, असा दावाही यावेळी उदित राज यांनी केला. 



काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मै भी चौकीदार' मोहिमेतंर्गत उदित राज यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर नावाच्या आधी चौकीदार असे संबोधन लावले होते. मात्र, मंगळवारी लोकसभेचे तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उदित राज यांनी चौकीदार हे संबोधन काढून टाकले होते.