नवी दिल्ली : देशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असल्याच्या जाहीराती आपण पाहत असतो. अनेकांचे उत्पन्नही दुप्पट झाल्याचेही आपण ऐकले असेल. पण प्रत्यक्षात बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. या दिवसांमध्ये बेरोजगारीने स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये भारताचा बेरोजगारी दर 7.2 टक्के होता. जो सप्टेंबर 2016 च्या तुलनेत सर्वाधिक आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) केलेल्या सर्वेक्षणानुसार हे वृत्त समोर आले आहे. गेल्यावर्षीच्या अहवालाप्रमाणे फेब्रुवारी 2018 मध्ये बेरोजगारीचा दर 5.9 इतका होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 कामगार सहभागाच्या प्रमाणात घट झाली असून नोकरीच्या शोधात असलेल्यांची संख्येत घट होत असून देखील बेरोजगारी दर वाढतच असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमीचे मुख्य महेश व्यास यांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये भारतात काम करणाऱ्यांची संख्या 40 कोटी होती जर गेल्यावर्षी ही संख्या 40.6 कोटी इतकी होती. न्यूज एजंसी रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 



 2016 मध्ये नोटबंदी आणि 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर 2018 मध्ये साधारण 1.1 कोटी जणांच्या हातून नोकऱ्या गेल्याचे सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. नोटबंदीचा छोट्या व्यावसायिकांवर झालेल्या परिणामासंदर्भात माहिती उपलब्ध नसल्याचे सरकारनने गेल्या महिन्यात सभागृहात सांगितले होते. याआधी बेरोजगारी संदर्भातील आकड्यांसहीत माहीती इंग्रजी वृत्तपत्रांनी छापली होती. या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये भारताच्या बेरोजगारीचा दर 45 वर्षात सर्वाच्च स्थानी होता. 




इंग्रजी दैनिक बिजनेस स्टॅंडर्डने एनएसएसओच्या थांबलेल्या अहवालातील बेरोजगारीचे आकडे छापले होते. या आकड्यानुसार 2017-18 मध्ये भारताच्या बेरोजगारीचा दर 45 वर्षात सर्वाधिक होता. 2017-18 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 6.1 टक्के होता. 1972-73 नंतर हा दर सर्वाधिक होता. एनएसएसओने दिलेल्या रिपोर्टनुसार शहरी भागांमध्ये बेरोजगारीचा दर 7.8 टक्के तर ग्रामीण भागांमध्ये हा दर 5.3 टक्के होता.