मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या आगामी विलीनीकरणानंतर ही देशातील ५ व्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनेल. हा करार झाल्यानंतर नव्याने तयार झालेली बँक म्हणजे ७५,००० कर्मचारी, ९६०० पेक्षा अधिक शाखा आणि १३,५०० पेक्षा जास्त एटीएम असलेले देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क असेल. या विलीनीकरणामागे देशातील एक मोठी आणि कार्यक्षम बँक तयार करून बँकिंग क्षेत्राला जोखीम व्यवस्थापनाबाबत अधिक सक्षम करण्याचा उद्देश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनियन बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक वेंकटेश मुचल यांनी सांगितले, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसेच ग्राहकांना अधिक चांगली उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने या तीन बँकांची एकत्रिकरणासाठी निवड केली आहे. या बँकांच्या विस्तृत जाळ्याद्वारे आणि विविध उत्पादने, आधुनिक तंत्रज्ञान व सेवांच्या माध्यामातून ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव आणि सुधारित भांडवल क्षमताही मिळेल. कॉर्पोरेशन बँक आणि आंध्र बँकेत एकसारखी कोअर बँकिंग सिस्टीम असल्याने युनियन बँक ऑफ इंडियामधील आयटी विभागा समोरील एकत्रिकरणाचे आव्हानही सोपे झाले आहे.



'भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्देशाला अनुसरून होत असलेल्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तरुण आणि महत्त्वाकांक्षी भारतीयांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, डेबिट आणि क्रेडिट कार्डासह अगदी नवे प्रीपेड फोरेक्स कार्ड आम्ही लवकरच सुरु करणार आहोत. तसेच ज्यादा भांडवल, बँकेच्या अनेक शाखांची उपलब्धता, ज्यादा शुल्क न घेता इंट्रा-बँक व्यवहार सुविधा असलेले विस्तीर्ण एटीएम नेटवर्क ग्राहकांसाठी उपलब्ध असेल, असे मुचल यांनी नमूद केले. 


या प्रस्तावित विलीनीकरणातील सर्वात आश्वासक पैलूंपैकी एक म्हणजे उत्पादनांच्या सवलती, सेवा आणि भौगोलिक दृष्ट्या तिन्ही बँकांची उपस्थिती. आंध्रप्रदेश आणि तेलंगणात आंध्र बँकेच्या ५२ टक्के शाखा असल्याने एकत्रिकरणातून उभ्या राहिलेल्या नव्या बँकेचे दक्षिण भारतातले जाळे मजबूत होईल. त्याचप्रमाणे कॉर्पोरेशन बँकेच्या ३० टक्के शाखा कर्नाटकात असल्याने दक्षिणेकडे अधिक शक्तीशाली नेटवर्क उभे राहणार आहे.