Gold Rate Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Union Budget) सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या. निर्मला सीतारमन यांनी सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करत असल्याचं जाहीर केलं. कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन थेट 6 टक्क्यांवर आणली आहे. तब्बल 9 टक्क्यांनी कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर लगेच सोनं स्वस्त झालं आहे. मुंबईत सोनं तब्बल 5 हजारांनी स्वस्त झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी कमी करत असल्याची घोषणा करताच सोन्याच्या दरांवर त्याचा परिणाम झाल्याचं दिसत आहे. मुंबईत सोनं तब्बल 5 हजारांनी स्वस्त झालं असून पुणे आणि जळगावात 3 हजारांनी दर कमी झाले आहेत. काल म्हणजेच सोमवारी मुंबईत सोन्याचा दर प्रतितोळा 73 हजार 500 रुपये होता. आज हा दर 68 हजार 500 रुपये झाला आहे. पुण्यामध्ये रविवारी सोनं 73 हजार 500 रुपये प्रतितोळा होतं. आज ते 71 हजार रुपये प्रति तोळा झालं आहे.


सोने व्यापारी कुमार जैन यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे की, "स्टॅम्प ड्युटी कमी केल्याने सोनं स्वस्त झालं आहे. 73 हजार 500 वरुन सोनं 67 हजारांवर आलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. लग्नं आणि गुंतवणूकदार यांची आता गर्दी होईल. ज्वेलर्ससाठी हा चांगला निर्णय आहे. गुंतवणूकदारांसाठीही ही चांगला दर आहे. लग्न असणारे आता दुप्पट सोनं विकत घेतील".


 


अर्थसंकल्पात कोणती घोषणा करण्यात आली?


सोनं, चांदी आणि प्लॅटिनम या मौल्यवान धातुंच्या कस्टम ड्युटीत 9 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. म्हणजेच आता कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळं सोनं स्वस्त होणार आहे. कस्टम ड्युटी कमी केल्याचा सरकारला एक फायदा देखील झाला आहे. सोव्हरिन बॉन्ड गोल्डचे रिडम्प्शनवर सरकारला 9 हजार कोटी रुपये कमी द्यावे लागणार आहे. 


केंद्र सरकारने सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला असला तरी एकीकडे व्यापाऱ्यांच्या मनात भीती आहे. लवकरच जीएसटी काऊन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत जीएसटीमध्ये वाढ केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. सध्या सोनं-चांदीवरील जीएसटी 3 टक्के इतका आहे. तोच जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच कस्टम ड्युटी 9 टक्क्यांनी कमी करुन सरकार जीएसटी 12 टक्के करु शकते. त्यामुळं पुन्हा सोनं महाग होण्याची शक्यता आहे. अशी माहिती इंडियन बुलियन मार्केटचे सेक्रेटरी सुरेंद्र मेहता यांनी दिली आहे.