निर्मला Budget च्या भाषणासाठी उभ्या राहताच नोंदवणार Record; मनमोहनही पडणार मागे
Union Budget 2024 Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ महिलावर्गाला कसा पोहचवता येईल यावर राहीला आहे. निर्मला सीतारमण या सरकारच्या महिला केंद्रीत धोरणाच्या चेहरा बनल्या.
Union Budget 2024 Updates: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 5 वर्ष सलग देशाचा आर्थिक गाडा हाकरणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पहिल्या महिला ठरणार आहेत. सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांच्या नावावर 5 पूर्ण आणि आजचा अंतरिम अर्थसंकल्प असे एकूण 6 अर्थसंकल्प सादर केल्याची नोंद होईल. सलग सहा वेळा अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम माजी अर्थमंत्री मोरारजी देसाईंच्या नावे आहे. जुलै 2019 पासून सीतारमण यांनी 5 पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. आजच्या भाषणानंतर निर्मला सीतारमण मनमोहन सिंह, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा या सर्वांना मागे टाकतील. या मंत्र्यांनी प्रत्येकी 5 अर्थसंकल्पीय भाषणं केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये निवडणूकीत पूर्ण बहुमत मिळाल्यावर निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थमंत्रालयाची सूत्र सोपवली. तेव्हापासून आज तागायत सीतारमण यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे असं म्हणायला हरकत नाही.
विक्रम आणि आव्हाने
विक्रमाची ही 5 वर्ष सीतारमण यांच्यासाठी सोपी अजिबात नव्हती. कोरोनाच्या सर्वात कठीण आर्थिक परिस्थितीतून सार जग जात असताना भारतासारख्या बड्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्याचे मोठं आव्हान सीतारमण यांच्या कार्यकाळात पेललं. जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत असताना भारताचा विकासदर मात्र 5 टक्क्यांच्या आसपास स्थिरवला. जगभरातल्या अर्थव्यवस्थामध्ये पैशांचे धबधबे येत असताना भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मर्यादीत पण पुरेसा आर्थिक डोस देण्याचा निर्णय सीतारमण यांच्याच कार्यकाळात झालाय. त्याच परिणाम म्हणून अमेरिकेसारखं मोठं महागाईचा आगडोंब भारतात उसळला नाही. दुसरीकडे रशिया युक्रेन आणि इस्राइल-हमास यासारखी दोन युद्धं देखील याच काळात झाली. त्याचाही धक्का जागतिक अर्थव्यवस्थांना बसला. या धक्क्यामधून भारताला सावरण्यातही अर्थमंत्रलायची मोठी भूमिका होती.
मोदी सरकारच्या महिला धोरणाचा चेहरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ महिलावर्गाला कसा पोहचवता येईल यावर राहीला आहे. निर्मला सीतारमण या सरकारच्या महिला केंद्रीत धोरणाच्या चेहरा बनल्या. आजच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या भाषणानंतर सीतारमण यांच्या स्वतःच्या शिरपेचात तर एक तुरा खोवला जाईलच याशिवाय अर्थविश्वात माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी, ब्रिटनच्या महिला अर्थमंत्री आणि पुढे पंतप्रधान झालेल्या मार्गारेट थॅचर यांच्यासारख्या यशस्वी महिलांमध्ये सीतारमण यांचं नाव जोडलं जाणार आहे.
सीतारमण यांच्यावरील टीका
देशाच्या सर्वच धोरणात्मक निर्णयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाप प्रत्येक वेळी बघायाला मिळते. त्यामुळेच मोदी एकटेच निर्णय घेतात इतर मंत्री सांगकामे असल्याची टीका नेहमीच होते. निर्मला सीतारमण यांच्यावरही ही टीका झाली आहे. स्वतःच्या कौशल्याचा वापर न करता इतरांच्या सूचनांवर चालणाऱ्या अर्थमंत्री अशी टीका सीतारमण यांच्यावर गेल्या 5 वर्षातल्या विविध टप्प्यांवर झाली आहे. विशेषतः अर्थसंकल्पाच्या काळात अशा टीकांना अधिक वेग येत असतो. पण सीतारमण यांनी या टीकांकडे जास्त लक्ष दिल्याचं दिसत नाही.