मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता असून तशी जोरदार चर्चाही रंगू लागली आहे. राणे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना परिस्थितीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार सातत्याने लांबणीवर पडलाय. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाचपणी सुरू केलीय. मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू,  काही नव्या चेहऱ्यांची वर्णी तर काही मंत्र्यांचं खातेबदल होण्याची शक्यता आहे.


नारायण राणे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला अमित शहा कोकणात आले  होते. तसंच महाराष्ट्रात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोकणात भाजपला चांगलं यश मिळालं होतं. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वामुळे भाजपाने कोकणात शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान दिल्याचंही बोललं जातं होतं. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी नारायण राणे यांच्या कामगिरीवर खुश असून नारायण राणे यांचं पक्षातील वजन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 


याशिवाय नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजतोय. याच मुद्दावरुन नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. 


सध्यातरी राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, याबाबत केवळ चर्चा आहे. प्रत्यक्षात  राणेंचं मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, याचं उत्तर तूर्त गुलदस्त्यात आहे.