स्थलांतरित मजुरांना स्वत:च्या गावातच रोजगार संधी; अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
पाहा सीतारमण यांनी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या....
नवी दिल्ली : गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गरीब कल्याण योजनेबाबत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी स्थलांतरित मजुरांचा मुद्दा अधोरेखित करत सर्वांचं लक्ष वेधलं. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता परिस्थिती बदलत गेली तसतसं अनेक स्थलांतरित मजूर शहरांतून त्यांच्या गावांच्या दिशेनं गेल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या.
६ राज्यांमधील जवळपास ११६ जिल्ह्यांमध्ये शहरांमधून सर्वाधिक मजूर परतले आहेत. या मजुरांच्या कौशल्याचा, त्यांच्या कामाचा तपशील केंद्राकडे असून त्या दृष्टीनं आखणीही करण्यात आली आहे. ज्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी खडगिया जिल्ह्यातून या अभियानाची सुरुवात करणार आहेत. २० जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याण रोजगार अभियानाचा शुभारंभ करणार आहेत.
सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार या श्रमिक १२५ दिवसांसाठी विविध प्रकल्पांवर काम करतील. त्यांची कौशल्य पाहता विहिरी खोदणं, रस्तेबांधणी करणं, इमारत बांधणीची कामं करणं असे विविध असेट बनवले जातील. सरकारकडून या मजुरांच्या पोटाची खळगी भरण्यात येण्याची जबाबदारी घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
गरीब कल्याण योजनेअंतर्गत १२५ दिवसांमध्ये सरकारच्या जवळपास २५ योजनांना एकत्र आणलं जाणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक योजनेला मजुरांना कशा प्रकारे फायदा होईल यावर भर दिला जाईल. शिवाय या योजनांअंतर्गत कामाची गरज असणाऱ्या मजुरांच्या हाताला काम देण्यासही प्राधान्य असेल.