मोठी बातमी! जम्मू- काश्मीरबाबत केंद्र सरकार महत्त्वाच्या निर्णयाच्या तयारीत
कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं गुरुवारी अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
नवी दिल्ली : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू- काश्मीर प्रांतामध्ये सातत्यानं काही घडामोडी घडत असतात. या घडामोडींवर साऱ्याच देशाच्या नजरा असण्यासोबतच केंद्र सरकारकडूनही सातत्यानं येथील परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. त्याच धर्तीवर आता, इथं चालणाऱ्या दहशतवादविरोधी कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं गुरुवारी अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या या बैठकीत सीआरपीएफ डीजींसोबतच सुरक्षा यंत्रणांशी संलग्न अनेक अधिकारीही सहभागी होणार आहेत. आयबी चीफ आणि अर्धसैन्यदलांचे अधिकारीही या बैठकीत सहभागी होणार आहेत.
कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?
जम्मू आणि काश्मीर प्रांतात सर्वसामान्यांना सातत्यानं दहशतवादाकडे वळवलं जात आहे. याच मुद्द्याला बैठकीत अधोरेखित करण्यात येणार असल्याचं कळत आहे. इथं सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसोबतच दहशतवादविरोधी कारवायांवरही चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
खोऱ्यात 90 मिनिटांत 3 हत्या
काश्मीर खोऱ्य़ामध्ये मंगळवार (5 ऑक्टोबर) रोजी 90 मिनिटांच्या कालावधीत संशयित दहशतवाद्यांनी तिघांची हत्या केली. गोळ्या झाडून करण्यात आलेल्या या हत्यांमध्ये मृतांपैकी एक व्यक्ती बिहारची रहिवासी असल्याचं म्हटलं गेलं.
'द रेसिस्टेंस फोर्स' या दहशतवादी संघटनेनं मंगळवारी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी घेतली. ही संघटना लष्कर ए तोयबाशीच संलग्न असल्याचं म्हटलं जात आहे.
जम्मू काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणत तेथील स्थानिकांना सुरक्षित वातावरणाची अनुभूती करुन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरक्षा दलांही बैठक त्याच प्रयत्नांपैकी एक असल्याचं म्हटलं जात आहे.