मुख्यमंत्र्यांनी बैठक कुठे घेतली, खुर्चीवर कोण बसलं होतं? रावसाहेब दानवेंचा टोला
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश
मुंबई : आगामी निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) कामाला लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक आमदार, खासदार यांची महत्वाची बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख यांची मुंबईतील शिवसेनेच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली.
रावसाहेब दानवे यांचा टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या बैठकीवर भाजचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक कुठे घेतली, बैठकीला कोण कोण होते, आणि खुर्चीवर कोण बसलं होतं, याचा शोध लावला पाहिजे असं दानवे यांनी म्हटलं आहे.
अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर
रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महापालिकेच्या निवडणुका येत आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण आहेत. आणि पक्षप्रमुखांनी तसा आदेश दिला तर सर्व शिवसैनिक तयार असतात. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या पक्षात कशी पद्धत आहे माहित नाही, पण शिवसेनेत एका पक्षप्रमुखाने आदेश दिला की आम्ही निवडणुकीला तयार असतो, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
टीका माझ्यावर सोडा - मुख्यमंत्री
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. निवडणुकीची तयारी करा आणि विकास कामांची पोचपावती जनतेपर्यंत पोहोचवा, असे स्पष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे. या टीकेला मी शांतपणे घेत आहे. कारण मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. ज्याला दाखवायचे त्याला मीत्याच वेळेला करून दाखवतो. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा आणि मी वेळीच माझ्या कामाने माझी पोचपावती देतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.