Union Minister House Set On Fire: केंद्रीय मंत्र्याच्या घरावर 1 हजाराहून अधिक लोकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री मणिपूरमध्ये घडली आहे. ईशान्येकडील राज्यामध्ये गुरुवारी झालेल्या हिंसाचारामध्ये थेट केंद्रीय मंत्र्याच्या घरालाच लक्ष्य करण्यात आलं. मागील अनेक आठवड्यांपासून मणिपूरमध्ये दोन गटांमध्ये वाद सुरु आहे. शेड्यू कास्ट म्हणजेच एसटी वर्गातील आरक्षणामध्ये एका जमातीच्या गटांना सहभागी करुन घेण्याच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या या वादाला हिंसक वळण मिळालं आहे. केंद्रीय मंत्री आर. के. राजन सिंह (rk ranjan singh) यांचं इम्फाळमधील घर आंदोलकांनी गुरुवारी रात्री पेटवून दिलं. यावेळेस केंद्रीय मंत्री घरात नव्हते. 


22 जण होते तैनात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर. के. राजन सिंह यांच्या कोंगबा येथे असलेल्या घरावर हा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे कर्फ्यु जारी करण्यात आलेला असतानाही मोठ्या संख्येनं लोक गोळा झाले आणि त्यांनी हा हल्ला घडवून आणला. हल्ला झाला तेव्हा या घराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 22 जणांना एवढ्या मोठ्या जमावासमोर घराचं संरक्षण करता आलं नाही. हल्ला झाला तेव्हा या घराच्या आवारामध्ये मंत्र्यांच्या वाहतूक व्यवस्थेमधील 9 जण, 5 सुरक्षारक्षक, 8 अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात होते.


1200 लोकांनी केला हल्ला


सुरक्षेत तैनात असलेल्या या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. "जमाव फार मोठ्या संख्येनं होता त्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. घराच्या सर्व बाजूंनी पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. घराची मागील बाजू असो किंवा पुढील गेट असो सर्व बाजूंनी बॉम्बचा मारा होत होता. त्यामुळे या जमावाला नियंत्रणात आणणं शक्यच नव्हतं," असं या घराच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेले कमांडर एल. दिनेश्वर सिंह यांनी सांगितलं. 1200 लोकांनी हा हल्ला केल्याचा दावा एल. दिनेश्वर सिंह यांनी केला आहे. 



दोन महिन्यात दुसरा हल्ला


आर. के. राजन सिंह यांच्या घरावर दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. मागील महिन्यातही त्यांच्या घरावर हल्ला झाला होता. मात्र त्यावेळी सुरक्षारक्षकांनी हवेत गोळीबार केल्यानंतर जमाव पांगला होता. मणिपूरमध्ये 'आदिवासींच्या समर्थनार्थ मोर्चा' काढण्यात आला होता. 3 मे रोजी या मोर्चाच्या मुद्द्यावर हिंसाचार झाल्यापासून मणीपूरमध्ये हिंसक झटापटी सुरु आहेत. 


मागच्या महिन्यातच मोदींना लिहिलेलं पत्र


मागील महिन्यात मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री असलेल्या आर. के. राजन सिंह यांनी दोन्ही गटांबरोबर बैठक घेतली होती. शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने त्यांनी ही बैठक घेतली होती. तसेच आर. के. राजन सिंह यांनी पंतप्रधान मोदींनी पत्र लिहून या वाद चिघळवण्यासाठी कोणता स्थानिक नेता जबाबदार आहे हे शोधून काढावं असंही म्हटलं होतं. मात्र आता आर. के. राजन सिंह यांच्या घरावरच हल्ला करण्यात आला आहे.