जयपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखळे जातात. नितीन गडकरी त्यांच्या विभागातील कामं ही ठरलेल्या तारखेच्या आधीच पूर्ण करतात. त्यामुळे त्यांची सर्वसामांन्यामध्ये एक चांगला आणि विकासकामाला प्राधान्याने देणारा मंत्री अशी प्रतिमा तयार झाली आहे. गडकरी आज (9 सप्टेंबर) राजस्थानमध्ये उपस्थित होते. यावेळेस गडकरी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानातील बाडमेरमध्ये  राष्ट्रीय महामार्ग 925 (NH 925) आपात्कालीन रनवे लँडिगचं उद्घाटन केलं. राष्ट्रीय महामार्गाचा वापर भारतीय एअरफोर्सची विमानांचं एमरजन्सी लँडिंग करण्याची ही पहिलीच वेळ असेल. अवघ्या 15 दिवसांमध्ये वायू सेनेसाठी रनवे बनवण्यासोबत अनेक किर्तीमान केल्याची माहिती गडकरींनी दिली. (Union Road Transport Minister Nitin Gadkari promised to iaf chief  rks bhadoriya for develop emergency landing strips in 15 days instead of 1.5 years)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकरी काय म्हणाले?      
 
"आयएएफ प्रमुख आरकेएस भदौरिया म्हणाले होते की, साधारणपणे रनवे बनवण्यासाठी दीड वर्ष लागतात. मी तेव्हा भदौरिया यांना आश्वासन दिलं होतं, की चांगल्या दर्जाचा रनवे फक्त 15 दिवसांमध्ये तयार करेन", असं गडकरी यांनी स्पष्ट केलं. 


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे तीन वर्ल्ड रेकॉर्ड


नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणादरम्यान त्यांच्या मंत्रालयाने केलेल्या 3 विश्व विक्रमाबाबतची माहिती दिली. "कोरोना काळातही आम्ही दररोज 38किलोमीटर रस्ता तयार केला, जो की वर्ल्ड रेकॉर्ड आहे. सोबतच मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेवर चौथ्या लेनसाठी 24 तासांमध्ये 2.5 किलोमीटर रस्ता तयार केला. तिसरा रेकॉर्ड म्हणजे एका दिवसात बिजापूर ते सोलापूरदरम्यान 26 किलोमीटर सिंगल लेन रस्ता तयार केला". सुरक्षा दलांच्या गरजेनुसार राजस्थानमधील कुंदन पुरा, सिंघानिया आणि बकासर गावात तीन हेलिपॅड बनवण्यात आले आहेत, असंही गडकरींनी नमूद केलं. 
 
राजनाथ सिंह काय म्हणाले?  


बाडमेरप्रमाणेच देशभरात एकूण 20 लँडिंग स्ट्रीपचं काम प्रगतीपथावर आहे. युद्धजन्य परिस्थितीत तसेच नैसर्गित आपत्तीदरम्यान या रनवेचा फायदा होईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मदतीने हॅलीपॅडही तयार केलं जात आहे. आपली सुरक्षा यंत्रणा आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.  


आपात्कालीन रनवे लँडिगचं उद्घाटन
 
गडकरी आणि सिंह यांनी  राजस्थानमधील बाडमेर येथील राष्ट्रीय महामार्ग -925 वरील सट्टा-गंधव खंड येथे (Satta-Gandhav Stretch)  भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी आपत्कालीन लँडिंगचं उद्घाटन केलं.हवाई दलाच्या विमानाने दोन्ही नेत्यांना घेऊन राष्ट्रीय महामार्गावर मॉक इमर्जन्सी लँडिंग केली. यामध्ये भारतीय वायुसेनेच्या सुखोई एसयू -30 एमकेआय लढाऊ विमान आणि सी -130 जे सुपर हरक्यूलिस विमानांचा समावेश होता.