नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात गडकरींनी 'स्वप्न दाखवणारे नेते लोकांना चांगले वाटतात, पण दाखवण्यात आलेली स्वप्न पूर्ण केली नाहीत तर जनता त्यांना दणकाही देते. त्यामुळे तीच स्वप्न दाखवा जे पूर्ण होऊ शकतील. मी स्वप्न दाखवणाऱ्यातला नाही... मी जे बोलतो ते १०० टक्के पूर्ण करून दाखवतो'... गडकरींच्या या वक्तव्यानंतर विरोधकांच्या भुवया उंचावल्यात. गडकरींच्या याच वक्तव्यावर निशाणा साधलाय एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नितीन गडकरींचं वक्तव्य समोर आल्यानंतर त्याचा अर्थ प्रत्येकानं आपापल्या परीनं काढायला सुरुवात केलीय. 'नितीन गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आरसा दाखवत आहेत' असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय.


यापूर्वीही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांत भाजपच्या पराभवानंतर पक्षाचे माजी अध्यक्ष गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली होती. 'पक्षाच्या नेतृत्वानं पराभव स्वीकार करायला हवेत' असं म्हणत त्यांनी एका नव्या चर्चेची सुरुवात केली होती. अनेकांनी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना टोमणा असल्याचं मानलं.


 


गडकरी उप-पंतप्रधान?


महाराष्ट्राचे प्रमुख शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) पत्र लिहून मोदींच्या स्थानावर गडकरींना आणण्याची मागणी केली. दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनीही जानेवारी महिन्यात गडकरींना उप-पंतप्रधान बनवण्याची मागणी केलीय.