उन्नाव बलात्कार पीडितेची स्थिती अत्यंत चिंताजनक
उन्नाव बलात्कार पीडितेची स्थिती चिंताजनक
नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडितेची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. ही तरुणी ९० टक्के भाजली आहे. तिला आधी लखनऊला आणि नंतर विमानानं दिल्लीला हलवण्यात आलं. तिची प्रकृती सध्या अत्यंत नाजूक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी जामीनावर सुटलेल्या आरोपीनं तिला आपल्या ४ साथीदारांच्या मदतीनं कोर्टात जात असताना जाळलं होतं. त्यामुळे बलात्कारातल्या आरोपींना जामीन मिळावा का, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
बलात्कार पीडिता जेव्हा न्यायालयात जात होती तेव्हा बलात्काराच्या दोन आरोपींसह ५ जणांनी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पीडिता ९० टक्के भाजली गेली आहे. पीडितेचे नातेवाईक या आरोपींना देखील तशीच शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.
पीडितेच्या नातेवाईकांनी म्हटलं की, 'यामुळे असं वाईट कृत्य करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. नाहीतर आज आमच्यासोबत झालं आहे उद्या इतर कोणासोबत होईल.'
घटनाक्रम
- 4:00 वाजता पीडिता घरातून निघाली.
- 4:48 वाजता ११२ नंबरवर पोलिसांना पीडितेला जाळलं गेल्याची माहिती मिळाली.
- 5:00 वाजता पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात हलवलं.
- 7:30 वाजता सकाळी पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- 10:30 वाजता डीएम देवेंद्र पांडेय आणि एसपी विक्रांत वीर घटनास्थळी पोहोचले.
- 11:20 वाजता आईजी झोन एसके भगत यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
- 4:15 वाजता संध्याकाळी कमिश्नर मुकेश मेश्राम हे देखील घटनास्थळी पोहोचले.