रायबरेली: उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी रविवारी रायबरेलीच्या अतरेली गावानजीक झालेल्या भीषण अपघातात गंभीररित्या जखमी झाली. या अपघातात पीडित तरुणीची काकी आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. तर वकील महेंद्र सिंह गंभीर जखमी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलीचे काका रायबरेली येथील तुरुंगात आहेत. त्यांना भेटायला हे सर्वजण तुरुंगाच्या दिशेने जात होते. यावेळी एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघाताच्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता. या भीषण अपघातात गाडीतील सर्वजण गंभीर जखमी झाले. 


हा अपघात इतका भीषण होता की, पीडित तरुणी असलेल्या कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. यामध्ये पीडितेच्या मावशीचा आणि काकीचा जागीच मृत्यू झाला. तर पीडित तरुणी आणि तिचे वकील गंभीरित्या जखमी झाले. त्यांना सध्या व्हेटिंलेटवर ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तिची अनेक हाडे फ्रॅक्चर झाली आहेत. तसेच तिच्या डोक्यालाही जबर मार लागला आहे. 


उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने भाजप आमदार कुलदीप सेंगर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. कुलदीपने पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. 


सेंगरचा भाऊ जयदीप सिंह याच्यासह पाच आरोपींच्या नावाचा समावेश होता. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने भाजपाचे आमदार कुलदीप सिंह  सेंगरला ताब्यात घेतले होते. 


यापूर्वी एप्रिल महिन्यात पी़डित तरुणीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, पोलीस कोठडीत असताना त्यांना अचानक अत्यवस्थ वाटू लागले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.