नवी दिल्ली : देशात एकिकडे Coronavirus कोरोना विषाणूचा उद्रेक चिंतेचा विषय ठरत असतानाच दुसरीकडे देशाच्या राजकीय वर्तुळातील काही मंडळी ही त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहेत. सध्या भाजपच्या अशाच एका आमदाराचं वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावत आहे. ज्यांनी मुस्लिम भाजी विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करु नये असा अजब आवाहनच दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश तिवारी असं या आमदार महोदयांचं नाव असून, देओरिया या जिल्ह्यातील नागरिकांना त्यांनी हे आवाहन केलं आहे. बारहाज मतदार संघातील प्रतिनिधी असणाऱ्या सुरेश तिवारी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हा सर्वांना जाहीरपणे सांगतो मुस्लिम विक्रेत्यांकडून तुम्ही भाजी खरेदी करु नका', असं ते या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे काही शासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा ते हे भलतंच आवाहन करत आहेत. 


संपर्क साधला असता, आपण हे वक्तव्य मागील आठवड्यात केल्याची माहिती खुद्द तिवारी यांनी दिली. नगर पालिकेच्या भेटीवर गेले असता त्यांनी हे वक्तव्य केलं होतं, जिथे काही शासकीय अधिकारीसुद्धा उपस्थित होते. कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी म्हणून हे विक्रेते थुंकीचा वापर करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण नागरिकांना त्यांच्या कडून भाजी खरेदी न करण्याचा सल्ला मी त्यांना दिला, या परिस्थितीनंतर त्यांना जे करायचं आहे तसं त्यांनी करावं, असं अतिशय बेताल वक्तव्य त्यांनी केल्याचं वृत्त 'इंडियन एक्सप्रेस'ने प्रसिद्ध केलं आहे. 


आपण फक्त मत व्यक्त केलं असून, त्याचं पालन करायचं आहे की नाही हे लोकांनीच ठरवावं अशा भूमिकेवर हे आमदार ठाम आहेत. दिल्लीतील तबलिघी जमातच्या कार्यक्रमातील परिस्थितीचा संदर्भ देत या लोकांनी देशासोबत काय केलं आहे, हे सर्वजण पाहूच शकतात या शब्दांत त्यांनी आपल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिलं.


 


दरम्यान, अतिशय संवेदनशील अशा मुद्द्यावरुन करण्यात आलेल्या या वक्तव्यासाठी पक्षाकडून कोणत्याही प्रकारचं समर्थन देण्यात येत नसल्याची माहिती भाजपचे राज्यस्तरीय प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी दिली.