या महाशयांनी रावण-शूर्पणखेशी केली राहुल-प्रियांकांची तुलना
`यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधी रावणाची भूमिका निभावत आहेत तर नरेंद्र मोदी रामाच्या भूमिकेत`
नवी दिल्ली : आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात राहिलेल्या भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. बलिया जिल्ह्यातील बॅरिया मतदारसंघातून ते आमदार आहेत. यावेळी ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिवपदी नियुक्ती प्रियांका गांधी या भावा-बहिणीची तुलना रावण आणि शूर्पणखा या रामायणातील पात्रांशी करून अडचणीत सापडलेत. 'यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधी रावणाची भूमिका निभावत आहेत तर नरेंद्र मोदी रामाच्या भूमिकेत आहेत....' असंही त्यांनी म्हटलंय.
'या रामायणात लंकेत विजय रामाचाच होणार असं धरून चला... ज्या पद्धतीनं लंका दहनापूर्वी रावणानं आपली बहिण शूर्पणखेला धाडलं होतं, त्याच पद्धतीनं राहुल गांधी यांनीही उत्तर प्रदेशात आपली बहिण प्रियांका यांना धाडलंय. यामुळे दुसरं काहीही नाही पण मोदींचाच विजय होणार आहे' अस सुरेंद्र सिंह यांनी म्हटलंय.
अधिक वाचा :- प्रियांका गांधी यांचा सक्रिय राजकारण प्रवेश आणि पाच महत्त्वाचे मुद्दे
'प्रियांका सीझनल नेत्या'
प्रियांका गांधी यांच्यावर टीका करत त्या 'सीझनल' नेत्या असल्याचं सुरेंद्र सिंह यांनी २५ जानेवारी रोजी एका जाहीर भाषणात म्हटलं. 'राजकारणात तीन प्रकारचे नेते असतात... सीझनल, रिजनल आणि ओरिजनल... जे निवडणुकीच्या सहा महिने अगोदर राजकारणात सक्रीय होतात आणि त्यानंतर इटलीला जाऊन राजकारण करतात ते सीझनल नेते असतात' असं म्हणतानाच त्यांनी प्रियांका गांधी यांना 'सीझनल नेत्या' म्हणत हिणवलं.
तर 'मायावती रिजनल नेत्या' आहेत असं सांगताना काही लोक राजकारणात गुन्हे, अपराध करत राजकारण खेळतात... त्यांचा उद्देश केवळ पैसा कमावणं हाच आहे, ते रिजनल नेते असतात, असंही त्यांनी म्हटलंय. ते इथेच थांबले नाही तर त्यांनी बसपा नेते 'बिकाऊ' नेते असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
अधिक वाचा :- प्रियांका गांधी अखेर सक्रिय राजकारणात
'हिंदूनी सन्मानासाठी मोदींना निवडून द्यावं'
वीज, पाणी आणि विकास या गोष्टींपेक्षा हिंदूंनी सन्मानासाठी योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी आणि भाजपलाच निवडून द्यायला हवं, असंही आवाहन त्यांनी मतदारांना केलंय.