लग्नघरात प्रेतांचा ढीग अन् रक्ताचा सडा.. मोठ्या भावाचा पत्नीसह सात जणांवर कुऱ्हाडीने हल्ला
UP Crime : उत्तर प्रदेशात लग्नघरात एका माथेफिरुने पत्नीसह सात जणांवर कुऱ्हाडीने वार केले आहेत. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला आहे.
UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) मैनपुरी येथे घडलेल्या एका घटनेनं सर्वांच्याच अंगावर काटा आणला आहे. मैनपुरीच्या एका गावात घरातील मोठ्या मुलाने कुटुंबातील 5 सदस्य आणि नातेवाईकांची निर्घृण हत्या केली आहे. घरातल्यांना संपवल्यानंतर मुलाने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली आहे. 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस (UP Police) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घरात फक्त मृतदेह इकडे तिकडे पडलेले सापडले आहेत. हत्याकांडाच्या आदल्या दिवशी आरोपीच्या लहान भावाचे लग्न झालं होतं. भावाची हत्या केल्यानंतर आरोपींने नव्या नवरीचा गळा चिरला आहे. आरोपीने त्याच्या पत्नी आणि मामीवरही हल्ला केला होता मात्र त्या पळून जाण्यात यशस्वी झाल्याने बचावल्या आहेत.
मैनपुरीच्या किष्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरसारा गोकुळपूर गावात शुक्रवारी मध्यरात्री हा सगळा भीषण प्रकार घडला. सुभाष यादव (65) यांचा धाकटा मुलगा सोनू यादव (23) याचे गुरुवारी गावातच लग्न होते. कुटुंबिय आणि नातेवाईक लग्नासाठी घरी जमले होते. शुक्रवारी रात्री घरात नाच-गाणी सुरू होती. त्यानंतर सर्वजण झोपायला गच्चीवर गेले. त्यानंतर मध्यरात्री सुभाष यादव यांचा मोठा मुलगा शिववीर यादव याने गच्चीवर झोपलेल्या नवविवाहितेचा धारदार शस्त्राने वार करून खून केला आणि त्यानंतर लहान भाऊ सोनूचीही हत्या केली.
यानंतर आरोपी शिववीर खाली आला आणि त्याने खोलीत झोपलेला दुसरा लहान भाऊ अभिषेक याच्यासह भाऊजी रामकृष्ण यादव याच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. त्याचवेळी त्याचा मित्र दीपक याचाही कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केला. पाच जणांच्या हत्येनंतर शिववीरने पत्नी आणि त्याच्या मामीवरही हल्ला केला. पण तोपर्यंत घरात सगळे जागे झाले होते. हे पाहून आरोपीनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. लोकांनी उठून पाहिले तर घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये फक्त मृतदेह आणि रक्त सांडलं होतं.
हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीच्या मामी आणि पत्नीने सगळा प्रकार आसपासच्या लोकांना सांगितला. त्यांनी तात्काळ दोघांनाही मैनपुरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी इटावा जिल्ह्यातील सैफई मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी सुभाष यादव यांच्याकडूनही या घटनेमागचे कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वडिलांनी सांगितले की, शिववीर किष्णी शहरातील सरकारी रुग्णालयाबाहेर झेरॉक्सचे काम करायचा. गेल्या काही दिवसांपासून दुकानात नुकसान झाल्याने तो नातेवाईकांकडे काही पैशांची मागणीही करत होता. यावरून वादही झाला होता. मात्र, घरात लग्न असल्याने सर्व काही सुरळीत सुरु होते.