ज्यूस पाजून हत्या; महिन्याभरानंतर उलगडलं तरुणाच्या हत्येचं गूढ; बालपणीचं प्रेम तरुणीनं `असं` संपवलं
UP Crime : वाराणसीमध्ये 26 मे रोजी झालेल्या देवांश यादव हत्या प्रकरणाचा अखेर खुलासा झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी देवांशच्या हत्येप्रकरणी त्याची आधीची प्रेयसीसह दोन जणांना अटक केली आहे. तब्बल महिन्याभरानंतर या हत्याकांडाचा उलघडा झाला आहे.
UP Crime : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) वाराणसीतील चंदौली येथील देवांश यादव हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पूर्वीच्या प्रेयसीने तिच्या बॉयफ्रेंन्डच्या मदतीने देवांश यादवची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी प्रेयसीसह आरोपी प्रियकराला अटक केली आहे. बीएचयू विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेल्या अनुष्का तिवारीने देवांशची निर्घृणपणे हत्या केली आहे. अनुष्का आणि देवांश पूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) होते आणि नंतर दोघेही वेगळे झाले. पण देवांश अनुष्काच्या मागे लागला होता. याच कारणावरून अनुष्काने प्रियकर राहुल सेठच्या मदतीने देवांशच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांच्या (UP Police) प्राथमिक तपासात उघड झाली आहे.
26 मे रोजी चांदौली येथे देवांशच्या हत्येची घटना घडली होती. घटनेच्या दिवशी बीएचयूमध्ये शिकणाऱ्या अनुष्काने देवांशला फोन केला होता. त्यानंतर दोघेही कारने फिरण्यासाठी निघाले होते. तर गाडी राहुल सेठ याचा मित्र शादाब आलम चालवत होता. राहुल स्कूटीवरून त्याच्यांमागून येत होता. वाटेतच अनुष्काने देवांशला झोपेच्या गोळ्या मिसळलेला ज्यूस प्यायला दिला. यामुळे तो बेशुद्ध पडला. मात्र थोड्याच वेळात देवांश शुद्धीवर येऊ लागल्याने सगळेच घाबरले.
कशी केली हत्या?
घाबरलेल्या शादाबने लगेचच कार साईडला लावली आणि राहुलसह शेजारी असलेल्या मोठमोठ्या दगडांनी देवांशच्या डोक्यावर अनेक वार केले. त्यानंतर शाबाद आणि राहुलने देवांशवर स्क्रू ड्रायव्हरने अनेक वार केले. त्यानंतर आरोपींनी देवांशवर गोळी झाडली. देवांशचा मृत्यू झालाय याची शाश्वती होताच दोघांनी त्याचा मृतदेह थोड्या अंतरावर असलेल्या नाल्यात फेकून दिला.
आरोपींना अटक
मुलगा बेपत्ता झाल्याने देवांशच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. देवांशच्या वडिलांनी अनुष्का आणि तिचे वडील आणि काका यांच्याविरुद्ध भेलूपूर पोलिस ठाण्यात मुलाचे अपहरण करून धमकावल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. त्यांना अनुष्का आणि राहुलवर संशय निर्माण झाला. दोघांची चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
बालपणीच्या मैत्रीचा अखेर क्रूर शेवट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवांश आणि अनुष्का हे बालपणीचे मित्र होते. त्यांनी कानपूरच्या सरस्वती इंटर कॉलेजमध्ये बारावीपर्यंत एकत्र शिक्षण घेतले. देवांश आणि अनुष्का काही वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, नंतर भांडण सुरू झाल्याने ते वेगळे झाले. त्यानंतर अनुष्का राहुलच्या प्रेमात पडली. मात्र तरीही देवांश तिचा पाठलाग करत होता. त्यामुळे तिने देवांशला मारायचे ठरवलं.