VIDEO: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सहकारी पळाले
Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. संतप्त जमावाने एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करून बेदम मारहाण केली. तर इतर सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्याला तिथेच सोडून पळ काढला.
Crime News : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) महोबा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याला (UP Police) जमावाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) तुफान व्हायरल होत आहे. तर या पोलीस कर्मचाऱ्याच्या इतर सहकाऱ्यांनी पळून जात आपला जीव वाचवला आहे. व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी स्वतःचा जीव वाचवून धावताना दिसत आहेत. सोमवारी रस्त्यावरील जमाव हटवण्यासाठी गेलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांना जमावाने लाठी काठीने मारहाण केली आहे. एका विद्यार्थ्याला बसने चिरडल्याने रस्त्यावर आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला.
महोबा जिल्ह्यातील पानवडी-अफतपुरा महामार्गावर सायकलवरून जाणाऱ्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेश परिवहनच्या बसने चिरडत पाच किमीपर्यंत नेले होते. मुलाचा मृतदेह आणि त्याची सायकल बसमध्ये अडकली होती. या घटनेनंतर संतप्त जमावाने रास्ता रोको करत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांनी आरडाओरडा करूनही चालकाने बस थांबवलीनाही. मृत मुलाचा मृतदेह बसचालकाने अपघाताच्या ठिकाणापासून पाच किमीपर्यंत फरफटत नेला. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी मुलाचा मृतदेह महामार्गावर ठेवला आणि घोषणाबाजी सुरू केली. आरोपी बस चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थ करत होते. अपघातानंतर बस थांबविण्याऐवजी चालकाने गाडी आणखी वेगाने पळवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी बस चालक पंचम आणि कंडक्टर आत्माराम याला ताब्यात घेतले. त्यानंतर अपघातास कारणीभूत असलेली रोडवेज बस पोलीस ठाण्यात नेण्यात आली. ही बातमी आजूबाजूच्या गावात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर ग्रामस्थ महामार्गावर जमा होऊ लागले आणि त्यांनी रस्ता रोखून धरला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या पथकाला धक्काबुक्की केली. त्यानंतर अचानक जमावाने एका पोलीस अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.