`आम्ही वर्षभर रडत राहिलो, पण त्याने...`; ब्रह्मकुमारी आश्रमात सख्ख्या बहिणींची आत्महत्या
UP Crime : उत्तर प्रदेशात ब्रह्मा कुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही बहिणींनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून नातेवाईकांना पाठवली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
Crime News : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) आग्रातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आग्रा येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात शुक्रवारी रात्री उशिरा दोन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह एकाच खोलीत वेगवेगळ्या फासांना लटकलेले आढळले. मृतदेहांमध्ये 4-5 फूट अंतर होतं आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही बहिणींनी चिठ्ठीही लिहिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
आग्रा इथल्या प्रजापती ब्रह्मा कुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या दोन्ही बहिणींनी सुसाईड नोट लिहून त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांना पाठवली होती. दोघींच्या नातेवाइकांना याची माहिती मिळताच त्यांनी आश्रमात धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. नातेवाई येईपर्यंत दोन्ही बहिणी दोरीला लटकलेल्या अवस्थेत होत्या. दुसरीकडे नातेवाईकांनी दोन्ही बहिणींच्या मृत्यूसाठी आश्रमातील चार जणांना जबाबदार धरले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे आरोपींना शिक्षा देण्याची मागणी
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये दोन्ही बहिणींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आरोपींना आसाराम बापूंसारखी शिक्षा देण्याची मागणी केली आहे. जगनेर येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात आत्महत्या केलेल्या बहिणींनी चारही आरोपींवर अनैतिक कृत्य करून पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी आग्रा बाहेरील आहेत. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
चार जणांची चिठ्ठीत नावं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता आणि शिखा यांनी 8 वर्षांपूर्वी ब्रह्मा कुमारीमध्ये दीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जगनेर येथे ब्रह्मा कुमारी केंद्र बांधले होते, ज्यामध्ये दोघेही राहत होत्या. शिखा हिने आत्महत्येपूर्वी एक पानी तर एकताने दोन पानी सुसाईड नोट लिहिली आहे. शिखाने आम्ही दोन्ही बहिणी गेल्या एक वर्षापासून त्रस्त असल्याचे त्यामध्ये म्हटलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी आश्रमातील नीरज सिंघल, धौलपूरचा ताराचंद, नीरजचे वडील आणि ग्वाल्हेर येथील आश्रमात राहणाऱ्या एका महिलेला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.
'नीरजने केंद्रात राहण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केंद्रात आल्यानंतर त्याने बोलणे बंद केले. आम्ही बहिणी वर्षभर रडत राहिलो, पण त्याने ऐकले नाही. त्याच्या वडिलांशिवाय ग्वाल्हेर आश्रमात राहणारी एक महिला आणि ताराचंद नावाच्या व्यक्तीनेही त्याला साथ दिली. 15 वर्षे एकत्र राहूनही त्याचे ग्वाल्हेर येथील एका महिलेशी संबंध होते. चौघांनी आमचा विश्वासघात केला आहे, असे एकताने चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. तर आमच्या वडिलांनी आश्रमातल्या लोकांना भूखंडासाठी 7 लाख रुपये दिले होते. गरीब लोकांकडू 18 लाख रुपये घेऊन आरोपींनी हडप केले. पैसे हडपण्यासोबत ते महिलांसोबत अनैतिक कृत्ये करतात आणि त्यांना कोणीही काहीही करू शकत नाही, असे ते सांगतात, असेही या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे.
'आमच्यासोबत कोणी नाही, आम्ही एकटे आहोत. त्यामुळे हे पाऊल उचलतो आहे. मी माझे प्रिय बंधू सोनवीर आणि एन सिंह यांना विनंती करतो की तुम्ही दोन्ही बहिणींच्या वतीने हा खटला लढवा. कितीही पैसा खर्च केला तरी तुम्ही आमच्या खऱ्या भावापेक्षा जास्त आहात. या चार नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. सर्व पुरावे आश्रमात ठेवले आहेत. आमची फसवणूक झाली आहे. त्यांच्याकडे आमचे 25 लाख रुपये आहेत,' असे या चिठ्ठीत म्हटलं आहे.